Join WhatsApp group

Ads

--

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

By Sarkar Maza

June 29, 2026 10:06 pm

Ads

न्यूज डेस्क– दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने कुरुम येथील दहिकर कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. सततच्या पावसामुळे या गरीब कुटुंबाचे मातीचे घर पूर्णपणे कोसळले असून, आज या कुटुंबावर उघड्यावर जीवन जगण्याची वेळ आली आहे.आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या या कुटुंबात एक विधवा महिला आणि तिच्या दोन मुली दुसऱ्याच्या घरात आश्रय घेऊन राहत आहेत.

तर वृद्ध आई-वडील आणि दोन भाऊ घरासमोरील एका छोट्याशा टिनाच्या वसरीत दिवस काढत आहेत. या वसरीत झोपणे तर दूरच, दोन-तीन माणसे एकत्र बसण्याइतकीही जागा नसल्याची विदारक परिस्थिती आहे.घरातील पुरुष मंडळी वाढत्या वयानुसार विविध आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत.

तर कुटुंबातील वृद्ध माता या वयातही दुसऱ्यांच्या घरी जाऊन मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. आपल्या कुटुंबासाठी त्या आजही मातेचे कर्तव्य पार पाडत असून, त्यांच्या संघर्षाची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे.दहिकर कुटुंबाची पंतप्रधान आवास योजनेत नोंदणी झाली असली, तरी प्रत्यक्ष घरकुलाचा लाभ अद्याप मिळालेला नाही.

दरम्यान, निसर्गाच्या या संकटाने कुटुंबाचे उरलेसुरले आश्रयस्थानही हिरावून घेतले आहे.या कुटुंबाला भेट दिल्यानंतर वृद्ध कुटुंबप्रमुखांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि त्यांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. “आता आम्ही कुठे जावे आणि कसे जगावे?” हा त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा मूक प्रश्न प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ठरत आहे.

आज या कुटुंबाला केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर माणुसकीच्या आधाराचीही नितांत गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि परिसरातील नागरिकांनी पुढे येऊन या कुटुंबाला तात्पुरत्या निवाऱ्यासह आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच, या कुटुंबाची अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेता शासन आणि प्रशासनानेही तातडीने जागे होऊन दहिकर कुटुंबाला त्वरित मदत, तात्पुरता निवारा आणि पंतप्रधान आवास योजनेचा लाभ प्राधान्याने देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या कुटुंबाला मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी माधापुरीचे माजी सरपंच श्री. प्रदीप ठाकरे यांच्याशी +91 93734 68309 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

“मानव एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” — राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!