Join WhatsApp group

Ads

अकोला LCB कडून ‘स्पेशल 26’चा पर्दाफाश; तोतया CBI अधिकाऱ्यांना बेड्या

By Sarkar Maza

June 20, 2026 3:41 pm

Ads

अकोला, दि. २० जून: खामगाव येथील एका व्यापाऱ्याला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन तोतया आरोपींना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद करत १०० टक्के रक्कम जप्त केली आहे.

या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३१८(१), २०४, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जून रोजी खामगाव येथील व्यापाऱ्याकडून स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत आरोपींनी २५ लाखांची रोख रक्कम जबरीने हिसकावून नेली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीची तीन विशेष पथके तयार करण्यात आली.

पथकाने रात्रंदिवस अथक परिश्रम घेत खामगाव ते बाळापूर मार्गावरील सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

हार्दिक मनोजकुमार गुरबानी (२२), रा. सिंधी कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा.

साहिल नंदकिशोर नथ्थानी (२५), रा. बीएचआर नगर, तलाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा.

आरोपींकडून गुन्ह्यातील संपूर्ण २५ लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल, दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपास पथकासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, उपनिरीक्षक माजीद पठाण तसेच एलसीबीच्या पथकाने पार पाडली.

या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!