Join WhatsApp group

Ads

सावरखेड शिवारात गांजाची शेती उघड; पिंजर पोलिसांची धडक कारवाई!

By Sarkarmzanews

November 26, 2026 8:21 pm

Ads

ऑपरेशन प्रहार नार्को स्ट्राईकअंतर्गत ४४ गांजाची झाडे जप्त; ७३ किलो ९५० ग्रॅम वजन, किंमत तब्बल ३७ लाख ४७ हजार ५०० रुपये

पिंजर : अकोला जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार नार्को स्ट्राईक’ अंतर्गत पिंजर पोलिसांनी गांजाच्या शेतीवर धडक कारवाई केली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील शेतशिवारात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत पोलिसांनी गांजाची एकूण ४४ झाडे जप्त केली असून, त्यांचे वजन ७३ किलो ९५० ग्रॅम आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ३७ लाख ४७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस स्टेशन पिंजरचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांना सावरखेड शिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून त्यांनी दोन पंच, राजपत्रित अधिकारी म्हणून नायब तहसीलदार आणि पोलीस पथकासह संबंधित शेतात छापा टाकला.

यावेळी शेतमालक देवराव काढनुजी अंभोरे (वय ५५, रा. सावरखेड, ता. बार्शीटाकळी) यांच्या शेतात गांजाची ४४ झाडे आढळून आली. पोलिसांनी पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर गांजाची झाडे नियमानुसार सीलबंद करण्यात आली असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ४७९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्यासह पोलीस अंमलदार गजानन काळे, नागसेन वानखडे, अमोल देवकते, भागवत गंजवे, राजेंद्र सावळे, महिला पोलीस अंमलदार मनीषा कांबळे, वैष्णवी भांडे आणि चालक होमगार्ड सुरज गावंडे यांनी सहभाग घेतला.

शेतशिवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड होत असताना यामागे केवळ एकच व्यक्ती आहे की यामागे आणखी काही साखळी कार्यरत आहे? पोलिसांच्या पुढील तपासातून याचे धागेदोरे उलगडतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!