Join WhatsApp group

Ads

नितीन देशमुखांचा मोठा गौप्यस्फोटआमचं राम नाम सत्य करणारं कोण होतं?

By Sarkarmzanews

November 25, 2026 6:49 am

Ads

‘आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहणार होतो म्हणून आमचा राम नाम सत्य होणार होता का?’ नितीन देशमुखांचा सवाल; शिंदेंच्या बंडावेळच्या घटनांवर पुन्हा चर्चा

अकोला : शिवसेनेतील फुटीच्या काळात नेमकं काय घडलं होतं, याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या ‘एका आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं’ या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन घडामोडींबाबत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. या राजकीय घडामोडीदरम्यान नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे दोन आमदार माघारी परतले होते. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही आमदारांच्या प्रतिक्रियांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

संजय शिरसाट यांनी त्यावेळच्या परिस्थितीचा संदर्भ देताना एका आमदाराचं ‘राम नाम सत्य’ झालं असतं, असं विधान केलं. संबंधित आमदार माघारी परतणार असल्यामुळे त्याच्याबाबत अशी परिस्थिती निर्माण झाली असती, असा दावा त्यांनी केला. मात्र, शिरसाट यांच्या या विधानानंतर नितीन देशमुख यांनी थेट प्रश्न उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

नितीन देशमुखांचा थेट सवाल!

नितीन देशमुख म्हणाले, “आता कोण चांगलं आणि कोण खराब ते काही आम्ही सांगू शकत नाही. आमचं राम नाम सत्य करणारं कोण होतं? जे संजय शिरसाट यांच्या तोंडून आलं की राम नाम सत्य होणार होतं, ते कोण? आम्ही तुमच्यासोबत सत्तेत सहभागी होणार नव्हतो म्हणून आमचा राम नाम सत्य होणार होता? आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहणार होतो म्हणून आमचा राम नाम सत्य होणार होता?”

देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे शिंदेंच्या बंडाच्या काळातील पडद्यामागच्या घडामोडींचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, त्यावेळी सुरत आणि गुवाहाटीच्या राजकीय नाट्यानंतर माघारी परतलेल्या आमदारांपैकी नितीन देशमुख यांनी उपस्थित केलेले प्रश्न अनेक राजकीय चर्चांना पुन्हा उजाळा देणारे ठरत आहेत.

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या ‘राम नाम सत्य’ या विधानाचा नेमका संदर्भ काय होता आणि त्यावेळी कोणत्या आमदाराच्या जीवाला धोका निर्माण झाला होता का, याबाबत त्यांच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. नितीन देशमुख यांनी उपस्थित केलेल्या सवालांमुळे शिवसेनेतील फुटीच्या काळातील जुन्या घटनांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!