Join WhatsApp group

Ads

---

विधवा महिला शेतकऱ्याच्या बोअरवेलवर दबंगांचा ताबा; जीवे मारण्याची धमकी, पिकांचे नुकसान

By Sarkarmzanews

February 8, 2026 4:27 pm

Ads

मुर्तीजापूर (दिनांक ०८) : तालुक्यातील कंझरा येथे एका विधवा महिला शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातील बोअरवेलवर गावातील काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवून पाणी वापरण्यास मज्जाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वारंवार विनंती करूनही संबंधितांनी मशीन न काढता उलट जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित महिला सध्या भीतीच्या छायेत जीवन जगत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार सविता तुळशीदास वाशिमकर (वय ५०, रा. कंझरा) यांच्या मौजे कंझरा शिवारातील गट क्रमांक १३९ मध्ये सुमारे ४ एकर ७ गुंठे शेती आहे.

त्यांच्या पती स्व. तुळशीदास वाशिमकर यांनी सहा वर्षांपूर्वी स्वतःच्या खर्चाने या शेतात बोअरवेल खोदली होती. मात्र, लगतच्या गट क्रमांक १४० चे मालक कुंदाबाई बबनराव देशमुख, बबनराव पुंडलीकराव देशमुख व जयेश बबनराव देशमुख यांनी कोणतीही परवानगी न घेता बोअरवेलवर जबरदस्तीने पाणी खेचण्याची मशीन बसविल्याचा आरोप आहे.

सविता वाशिमकर यांनी मशीन काढून घेण्याची विनंती केल्यानंतर संबंधितांनी सहकार्य करण्याऐवजी दमदाटी केल्याचे सांगितले जाते. “तुझ्याकडून जे होते ते करून घे, आमचे कोणी काहीही करू शकत नाही,” अशी धमकी देत बोअरवेलवर पूर्ण ताबा मिळविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, एकटी महिला असल्याचा फायदा घेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान, शेतात उभी पिके असताना स्वतःच्या हक्काचे पाणी वापरता येत नसल्यामुळे पिके वाळण्याच्या स्थितीत असून मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती पीडित महिलेने दिली.

“मी एकटी असल्याने मला मानसिक त्रास दिला जात असून भीतीच्या वातावरणात राहावे लागत आहे,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा व दबंगगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिला शेतकऱ्याने केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!