Join WhatsApp group

Ads

-

ऑपरेशन प्रहारला कोणते अधिकारी देत आहे तिलांजली? चांदखां-सोनटक्के प्लॉटमध्ये जुगार पुन्हा सुरू

By Sarkarmzanews

February 10, 2026 5:16 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी | दिनांक १०

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कठोर भूमिकेमुळे जुने शहर परिसरातील अनेक बेकायदेशीर धंद्यांना चाप बसला होता. जुगार, अवैध दारूविक्री व इतर गैरकृत्यांवर पोलिसी धडक कारवाई सुरू असल्याने शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत झाल्याचा दिलासा नागरिकांना मिळाला होता. मात्र, निवडणुकीचा धूर खाली बसताच पुन्हा अवैध धंदे डोके वर काढू लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, चांदखां प्लॉट आणि सोनटक्के प्लॉट परिसरात जुगाराचे टेबल पुन्हा सर्रास सुरू झाल्याचे चित्र दिवसाढवळ्या उघड डोळ्यांनी दिसत आहे. उघडपणे चालणाऱ्या या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “हे अड्डे एवढ्या निर्धास्तपणे सुरू राहतात तरी कसे?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणुकीपूर्वी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कारवाई अचानक का थंडावली,ऑपरेशन प्रहारला कोणते अधिकारी देत आहे तिलांजली? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ज्या ठिकाणी कारवाईमुळे अवैध व्यवसाय बंद झाले होते, त्याच ठिकाणी पुन्हा जुगार सुरू होणे म्हणजे कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत.

स्थानिक रहिवाशांच्या मते, या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील तरुण पिढी भरकटत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे प्रकार वाढत असून, सामाजिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

आता या संपूर्ण प्रकारामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे, कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची जबाबदारी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांवर येऊन ठेपली असून, पुन्हा एकदा धडक कारवाई होणार की अवैध धंदे मोकाटच राहणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

कायद्याचा धाक राहणार की जुगार माफियांनाच मोकळे रान मिळणार? — हा प्रश्न आता अकोल्याच्या रस्त्यावर खुलेआम विचारला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!