Join WhatsApp group

Ads

-

वाडेगाव : निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे पाच–सहा महिन्यांतच रस्ता बेहाल

By Sarkarmzanews

December 26, 2025 8:31 pm

Ads

वाडेगाव : दिनांक २६ : वाडेगाव येथील वार्ड क्रमांक तीनमधील पोस्ट ऑफिस ते मयूर इलेक्ट्रॉनिक या दरम्यानचा रस्ता अवघ्या पाच ते सहा महिन्यांतच पूर्णपणे खराब झाला असून ग्राम प्रशासनाने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. 15व्या वित्त आयोगातून सदर रस्ता पेवर ब्लॉकने बांधण्यात आला होता. मात्र दर्जाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याचे काठही पूर्णपणे कोसळले आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने परिसरात घाण पाणी साचले आहे. श्री पाळेश्वर मंदिराजवळ परिस्थिती अधिक गंभीर असून तेथे कायमस्वरूपी दुर्गंधी पसरलेली आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना या घाण पाण्यातून जावे लागत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा घाण पाणी मंदिराच्या परिसरातही जात असल्याने पवित्र स्थळाची स्वच्छता धोक्यात आली आहे.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की रस्त्याच्या बांधकामाला फार काळ लोटलेला नसतानाही हा रस्ता पूर्णपणे निकामी झाला आहे. नाल्यांची योग्य साफसफाई न केल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना या परिस्थितीचा विशेष त्रास होत आहे.

ग्राम प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच तातडीने रस्त्याची दुरुस्ती व नाल्यांची साफसफाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!