Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुंड तडीपार

By Sarkar Maza

March 5, 2026 8:36 am

Ads

मूर्तिजापूर : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तिघांवर कठोर कारवाई करत त्यांना अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.


मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नितेश उर्फ नीलेश प्रभाकर थोप (३८, रा. खरब ढोरे), आनंद निर्दोष घोसले (२८, रा. सिरसो गायरान) आणि कादरखान उर्फ कादर शेख गफार (३०, रा. धोत्रा शिंदे) या तिघांना संबंधित जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.


तिघांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोवंश व जनावरे चोरी, खून, गंभीर दुखापत, प्रतिष्ठित नागरिकांना ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करणे व खंडणी उकळणे, अमली पदार्थ बाळगणे, घातक शस्त्रे बाळगणे, चैनस्नॅचिंग, इच्छापूर्वक दुखापत करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.


या इसमांवर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार तो मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.


कायदेशीर पडताळणीनंतर संबंधित तिघांना अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!