Join WhatsApp group

Ads

-

हातगाव ग्रामपंचायतीत खळबळ : सरपंचांवर प्रोसिडिंग बुक पळविल्याचा आरोप, सदस्यांची तक्रार

By Sarkarmzanews

February 7, 2026 5:19 pm

Ads

मूर्तिजापूर: दिनांक ०६ : तालुक्यातील हातगाव ग्रामपंचायतीत आज सकाळी घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. गावचे सरपंच अक्षय जितेंद्र राऊत यांनी ग्रामपंचायतीचे अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज असलेले प्रोसिडिंग बुक (सभा नोंदवही) कोणतीही परवानगी न घेता सभागृहातून पळवून नेल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. या प्रकरणी सरपंचांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हातगाव ग्रामपंचायत सभागृहात नियोजित सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभा सुरू होण्यापूर्वीच सरपंच अक्षय राऊत यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करत प्रोसिडिंग बुक स्वतःच्या ताब्यात घेतले आणि कोणालाही माहिती न देता ते सभागृहाबाहेर घेऊन गेले, असा आरोप सदस्यांनी केला आहे.

सभेचे कामकाज ठप्प

प्रोसिडिंग बुक हे ग्रामपंचायतीचे अधिकृत व महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज असून ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असते. सरपंचांनी ते बळजबरीने नेल्यामुळे नियोजित सभेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. या घटनेमुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदस्यांची कारवाईची मागणी

या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य योगेश श्रीराम सोळंके व अक्षय सुरेश जोगळे यांनी पंचायत समिती मूर्तिजापूर येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सरपंचांचे हे कृत्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ अंतर्गत पदाचा गैरवापर व गंभीर गैरवर्तनाच्या कक्षेत येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सरकारी कागदपत्रे खाजगी ठिकाणी नेणे हा कायदेशीर गुन्हा असून तातडीने चौकशी करून प्रोसिडिंग बुक हस्तगत करावे व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे हातगावात तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!