Join WhatsApp group

Ads

-

“पतंगासाठी धावणारी पावलं, मृत्यूकडे पोहोचली”– “प्रशासन जागं झालं नाही तर आणखी कित्येक बालपण हरवणार अश्या कित्येक विहिरीत!”

By Sarkarmzanews

January 21, 2026 2:27 am

Ads

मुर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील परदेशीपुरा येथे घडलेली हृदयद्रावक घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. पतंग पकडण्याच्या नादात उघड्या विहिरीत पडून सुमारे ११ वर्षांचा शेख उमर शेख शकील या निष्पाप बालकाचा मृत्यू होणे ही घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. अवघ्या अकरा वर्षांच्या बालकाचा जीव जाणे ही केवळ त्या कुटुंबाची हानी नसून, ही समाज, प्लॉट मालक आणि प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे.

बालपण आणि पतंग पकडणे हे कोणत्याही समाजाच्या निरागसतेचे प्रतीक असते. मोकळ्या आकाशात उडणारा पतंग, धावणारी पावले आणि चेहऱ्यावरचं हसू—यात कुठेही मृत्यूचा विचार नसतो. मात्र आज हेच निरागस बालपण शहरातील उघड्या विहिरी, निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे थेट मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे. खेळताना जग पाहायचं वय असलेल्या अकरा वर्षांच्या लेकराला जमिनीतल्या अंधारात गमवावं लागणं, यापेक्षा समाजासाठी वेदनादायक वास्तव दुसरं कोणतं असू शकत नाही. हा मृत्यू एका मुलाचा नाही, तर आपल्या संवेदनशीलतेचा आणि सुरक्षिततेच्या जाणिवेचा आहे.

या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे, त्या बालकाचे शव बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला तब्बल तीन तासांहून अधिक वेळ लागला. यावरून संबंधित विहीर किती खोल आणि अत्यंत धोकादायक होती, याची सहज कल्पना येते. इतकी खोल विहीर वर्षानुवर्षे उघडी असताना तिचा धोका प्लॉट मालकाला माहिती नव्हता, असे मानणे कठीण आहे. तरीही कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता ती विहीर उघडी ठेवण्यात आली, हे गंभीर निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही विहीर संबंधित प्लॉटमध्ये अनेक वर्षांपासून उघडी होती. रहिवासी परिसरात, लहान मुले सतत वावरत असताना संरक्षण भिंत, झाकण किंवा धोक्याचा इशारा फलक नसणे हा केवळ दुर्लक्षाचा नव्हे, तर बेफिकिरीचा प्रकार आहे. कायद्याच्या दृष्टीने पाहता, अशा निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू हा अपघात न राहता सदोष मनुष्यवधाच्या चौकटीत मोडतो.

या प्रकरणात माणूसकीचा अभावही तितकाच संतापजनक ठरतो. इतकी मोठी दुर्घटना घडूनही संबंधित प्लॉट मालकाने माणूसकीच्या नात्यानेसुद्धा मृत बालकाच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, अशी माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. एका निष्पाप अकरा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतरही संवेदना व्यक्त करण्याची गरज वाटू नये, हे समाजासाठी अधिक चिंताजनक आहे.

या घटनेने शहरासह ग्रामीण भागातील उघड्या विहिरींचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुर्तिजापूर शहरात तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागात अनेक विहिरी आजही उघड्या अवस्थेत आहेत. अशा धोकादायक ठिकाणांची संख्या प्रशासनाला माहीत आहे का, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे पुढचे पाऊल काय, हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिक विचारत आहे. केवळ एका घटनेनंतर तात्पुरती हालचाल करून पुन्हा दुर्लक्ष केले जाणार, की शहर व ग्रामीण भागातील सर्व उघड्या विहिरींचे सर्वेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.

प्रशासनाची भूमिकाही या घटनेत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहरातील उघड्या विहिरी व धोकादायक ठिकाणांची पाहणी करून कारवाई करणे ही नगरपरिषद व संबंधित विभागांची जबाबदारी आहे. जर ही विहीर दीर्घकाळ उघडी होती, तर प्रशासनाला याची माहिती नव्हती का, की माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच आज एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत बालकाच्या कुटुंबाला केवळ सांत्वनाचे शब्द नव्हे, तर तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, तसेच संबंधित प्लॉट मालकाकडून नागरी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. जबाबदारी निश्चित न करता प्रकरण दाबले गेले, तर हा अन्याय अधिक तीव्र होईल.

जर या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल न होता प्रकरण ‘अपघात’ म्हणून बंद करण्याचा प्रयत्न झाला, तर ‘सेटिंग’ झाल्याचा संशय नागरिकांच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. कायद्यापेक्षा ओळखी आणि आर्थिक बळ मोठे ठरत असतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळतो.

आज शहरातील एक अकरा वर्षांचा बालक गमावले गेले आहे. उद्या दुसरा बळी पडू नये, यासाठी उघड्या विहिरी आणि धोकादायक ठिकाणांबाबत तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषींना शिक्षा झाली, तरच अशा घटना थांबतील. अन्यथा प्रत्येक अशा मृत्यूची जबाबदारी ही नियतीवर नव्हे, तर माणसाच्या निष्काळजीपणावर आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर जाईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!