Join WhatsApp group

Ads

श्री गजानन महाराज सामूहिक महापारायण भक्तिभावात संपन्न

By Sarkarmzanews

January 12, 2026 11:28 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक १२:दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून श्री गजानन महाराज भक्त परिवार, मूर्तिजापूर यांच्या वतीने निशुल्क सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण मोठ्या भक्तिभावात पार पडले.

स्थानिक तिडके नगर येथील श्री वेंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात, अग्रवाल बुक डेपो व ढेरे परिवार यांच्या सहकार्याने रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी या पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक सोहळ्यास परिसरातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.या प्रसंगी सुविख्यात व जगप्रसिद्ध मुखोद्गत पारायण वाचिका सौ. विद्याताई पडवळ–उनवणे (ठाणे निवासी) यांनी आपल्या सुमधुर व प्रभावी वाणीतून अध्याय महात्म्य, पारायणाचे वाचन तसेच संक्षिप्त निरूपण केले.

त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.पारायणादरम्यान १९व्या अध्यायाच्या वेळी अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर महाराजांचे अनुभव, चमत्कार व अध्यायांचे महात्म्य ऐकताना उपस्थित भाविक भारावून गेले.

पारायण केवळ वाचनापुरते मर्यादित न राहता, महाराजांच्या अनुभूती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य यावेळी घडले.सर्व पारायणकर्ते, सेवेकरी व आयोजकांनी शेगावच्या धरतीप्रमाणे पारायणाची पवित्रता व शिस्त अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

उपस्थित भाविकांसाठी चहा, फराळ तसेच महाप्रसादाची उत्तम व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.सर्वांच्या सहकार्याने आणि महाप्रसादाने या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!