Join WhatsApp group

Ads

धक्कादायक! विधवेच्या पैशांवर डोळा; नकार देताच गळा आवळून खून, खडकीतील थरारक घटना उघड • खदान पोलिसांची झटपट कारवाई • आरोपी अकोटमधून अटक

By Sarkar Maza

March 8, 2026 8:32 am

Ads

प्रतिनिधी | अकोला : शहरातील खडकी परिसरात पैशांच्या वादातून एका विधवा महिलेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. खदान पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अकोट येथून अटक केली.

मृत महिलेचे नाव दीपाली राहुल टाले (वय ४०, रा. संतोषनगर नं.२, खडकी) असे आहे. गुरुवार ५ मार्च २०२६ रोजी तिचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मृत्यू संशयास्पद असल्याची नोंद सर्वोपचार रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने सखोल तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान मृत महिलेचा भाऊ अमित मिश्रा यांनी संशयित जमील शाह उर्फ अजिम शाह (रा. चोहट्टा बाजार) याच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


पैशांसाठी वाद, संतापातून खून

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत दीपाली टाले यांच्या पतीचा पाच-सहा वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. त्या आपल्या दोन मुलांसह खडकी परिसरात राहत होत्या. आरोपी जमील शाह हा मालवाहू वाहन चालक असून त्याच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.

दरम्यान, दीपाली या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे साठवत होत्या. ५ मार्च रोजी आरोपीने तिच्याकडे असलेले १४ हजार रुपये पाहिले. त्यानंतर त्याने वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र दीपाली यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने महिलेचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपीने तिचा मोबाइल व १४ हजार रुपये रोख घेऊन पळ काढला.


अकोटमध्ये बहिणीकडे लपला; पोलिसांचा सापळा

घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके तयार करण्यात आली.

डीबी पथकातील संजय वानखडे, संदीप काटकर, गिरीश वीर, भूषण मोरे, कालूराम पवार व जाधव यांनी अकोला, अकोट, अंजनगाव सुर्जी आणि चोहट्टा बाजार परिसरात शोधमोहीम राबवली.

तांत्रिक तपासादरम्यान आरोपी अकोट येथे आपल्या बहिणीकडे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अकोट येथून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


🟥 इनसाइड स्टोरी

ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर

मृत दीपाली टाले यांनी २००९ मध्ये राहुल टाले यांच्याशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या मुलांसह भाड्याच्या घरात राहत होत्या.

घर बदलण्याच्या प्रक्रियेत मालवाहू वाहन चालक असलेल्या आरोपीशी त्यांची ओळख झाली. पुढे ही ओळख जवळीकीत बदलली. मात्र पैशांच्या लोभामुळेच या संबंधांचा शेवट निर्घृण हत्येत झाला.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!