Join WhatsApp group

Ads

-

रात्रीच्या अंधारात वाळू उपसा; अपघाताने उघड झाली भीषण वास्तवता

By Sarkar Maza

April 21, 2026 5:58 pm

Ads

मुर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील नदीपात्रांमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक हा प्रकार दिवसेंदिवस बिनधास्तपणे वाढत असून, प्रशासनाच्या नियमांना खुलेआम धाब्यावर बसवले जात असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शासनाने सूर्यास्तानंतर वाळू उपसण्यावर स्पष्ट बंदी घातली असतानाही, रात्रीच्या अंधारात काही घाटांवर सर्रास वाळू उपसा सुरू असल्याने ‘वाळू माफिया’ प्रशासनालाच उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास तपे हनुमान मंदिर ते सिरसो रोडदरम्यान एक भीषण अपघात घडला. रेतीने भरलेल्या एका अज्ञात ट्रॅक्टरने दोन वृद्धांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून फरार झाला, ज्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या अपघातात सय्यद चांद (वय ६५) आणि भीमराव गावंडे (वय ७०), दोघेही रा. सिरसो, हे गंभीर जखमी झाले. प्रथम त्यांना लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितले की, या परिसरात विनानंबर, बेफाम वेगाने धावणारे ट्रॅक्टर रोजच पाहायला मिळतात. धोकादायक ओव्हरटेक, जीवघेणे कट आणि नियमांची पायमल्ली ही आता सामान्य बाब झाली असून, प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, “प्रशासन केवळ पाहत बसणार का? मोठा अपघात झाल्यानंतरच जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेती माफियांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील हा प्रकार केवळ बेकायदेशीर वाळू उपसाचा मुद्दा राहिलेला नसून, आता तो थेट नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारा गंभीर प्रश्न बनला आहे.

photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!