Join WhatsApp group

Ads

रोहणा- पोही पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात; आ. हरिष पिंपळे यांचा मंत्रालयात जोरदार पाठपुरावा

By Sarkar Maza

May 5, 2026 8:17 pm

Ads

मुंबई, दि. ५ मे – मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील उमा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित झालेल्या रोहणा व पोही गावांच्या पुनर्वसनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या उंबरठ्यावर आहे. या पुनर्वसन प्रस्तावास ‘विशेष बाब’ म्हणून मंत्रिमंडळाची मान्यता मिळावी, यासाठी आमदार हरिष पिंपळे यांनी मंत्रालयात ठोस आणि प्रभावी पाठपुरावा केला.

आज मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आ. पिंपळे यांनी नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक जयराज कारभारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रोहणा व पोही ग्रामस्थांच्या समस्या आणि अडचणी सविस्तर मांडत, उमा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली.या बैठकीस कार्यकारी अभियंता सानप यांचीही उपस्थिती होती.

प्रस्तावातील तांत्रिक बाबी, पुनर्वसन प्रक्रियेतील अडथळे आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रस्तावाला मंत्रिमंडळाची विशेष मान्यता मिळाल्यास पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.बाधितांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत असलेले आ. पिंपळे म्हणाले, “उमा बॅरेज प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

रोहणा आणि पोही येथील ग्रामस्थांना न्याय मिळवून देणे ही माझी प्राथमिकता असून, हा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर ठेवून मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”या पाठपुराव्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न आता निकाली निघण्याची चिन्हे दिसत असून, रोहणा व पोही परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!