Join WhatsApp group

Ads

--

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता गड्ड्यांत; चौकशीची मागणी तीव्र

By Sarkar Maza

February 26, 2026 11:40 am

Ads

वाडेगाव : दिनांक २६ : महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गावांना शहरी भागाशी जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र वाडेगाव ते तामशी व पिंपळगाव या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था पाहता कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेला हा रस्ता कालावधी संपण्यापूर्वीच ठिकठिकाणी उखडला असून मोठमोठे गड्डे पडले आहेत.

त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या गड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याच्या कामात टेंडरनुसार आवश्यक दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले नसावे. डांबराचा थर कमी असल्याची व बेस मजबूत नसल्याची चर्चा गावात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर मौजा तामशी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीमार्फत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, अकोला यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रारीत रस्त्यावरील गड्डे तातडीने बुजवून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) युवा सेना लोकसभा अध्यक्ष नितीन पाटील मानकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “वाडेगाव–तामशी रस्त्यावरील गड्डे त्वरीत बुजवण्यात यावेत. अन्यथा मंत्रालयात तक्रार दाखल करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी.

शासनाच्या वतीने झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करून तो निधी पुन्हा शासन तिजोरीत जमा करण्यात यावा आणि रस्ता नव्याने करण्यात यावा.”या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

आता प्रशासन यावर किती त्वरीत कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!