Join WhatsApp group

Ads

---

✒️पोलीस यंत्रणा की राजकीय नोकरी? वरली–मटका आणि गुटख्याने मुर्तिजापूर बदनाम🎯

By Sarkarmzanews

January 18, 2026 9:04 am

Ads

दिनांक १८ : ✒️– प्रेमराज शर्मा :

मुर्तिजापूर शहरात सध्या एक विचित्र चित्र दिसत आहे. वरली – मटका – गुटखा कुठे सर्रास सुरू तर कुठे बंद आहे, तर कुठे फक्त मोबाईलवरून वरली मटका हा अवैध व्यवसाय भूमिगत पद्धतीने सध्या चालत आहे.

प्रश्न साधा आहे—कायदा सर्वांसाठी समान आहे की राजकीय रंग पाहून बदलतो?

नगरपरिषद निवडणुकीनंतर या अवैध धंद्यांचे चित्र अचानकपणे बदलले.

कालपर्यंत ज्यांना राजकीय आश्रय होता, ते आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेले आणि त्यांचे धंदे “कायदेशीर कारवाई”च्या नावाखाली बंद झाले.

जे सत्ताधारी पक्षाच्या जवळ आहेत, ज्यांचे मित्र, नातेवाईक, कार्यकर्ते आज नगरपरिषदेतील मोठ्या पदांवर विराजमान आहेत—त्यांच्याच मंडळींचे वरली–मटका–गुटखा खुलेआम सुरू आहे.

काही नेत्यांचे हे धंदे स्वतःचे होते तर काही नेत्यांची तर या धंद्यांन मध्ये भूमिगत पार्टनरशिप होती, समाजाला लुटून त्यांची दिशाभूल करून समाजाचाच पैश्यातून त्यांनी समाजसेवा केली व समाजसेवक म्हणून समाजात मिरले व समाजसेवेचा भपका दाखवत समाजाचा भरवश्यावर व समाजाच्या लुटलेल्या पैश्यावर उमेदवारी लढवली.

आज हेच कथित समाजसेवक नेते बनून संवैधानिक पदावर बसले व काहींनी राजकारणात पैशाचा जोर दाखवून नगरसेवकाचा पदावरून उच्चस्तरीय पद गाठले.

आज मित्र व नातेवाईक यांचा नावावर धंदे परत सुरू करून जनतेला परत लुटण्याचे काम सुरू केले आहे आणि भोळी भाबडी जनता त्यांच्या या जाळ्यात फसून गेली व आत्ता हेच नेते कमिशन खोरीची स्वप्न सुद्धा बघत आहे.

नगरपरिषदेत खाते वाटप सुद्धा झाले नाही तरी येणाऱ्या निवडणुकीत या निवडणुकी पेक्षा जास्त आपलाच माहोल असणार आणि भविष्यातील नगराध्यक्ष आपणच ! असे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहे. काळ्या पैश्याचा हा खेळ व त्यातील उभा रहाणारा आत्मविश्वास लोकशाहीला व शहराचा जनतेसाठी व तरुण पिढी साठी घातक आहे.

हा योगायोग आहे का?

की ही निव्वळ राजकीय सूडबुद्धीने चालवलेली ‘कायदा व्यवस्था’?

अवैध धंद्यांने होत आहे शहराचे सामाजिक नुकसान : आपलच शहर जात आहे हळू हळू अंधाराकडे.

वरली–मटका – गुटखा हा केवळ जुगार किंवा व्यसन नाही,तो दारिद्र्य निर्माण करणारा, कुटुंब उद्ध्वस्त करणारा आणि तरुण पिढीला व्यसनाधीन करणारा सामाजिक कर्करोग आहे.

रोजंदारीवर जगणारा मजूर जुगारात पैसे घालतो घरखर्च बिघडतो, कर्ज वाढते,चोरी, मारहाण, यासारखे गुन्हे,आत्महत्या, गुटख्यामुळे कर्क रोगाचा धोखा , शारीरिक व मानसिक आरोग्य खराब होणे अश्या वाढत्या समस्या, तरुणांचा शिक्षणावर परिणाम व समाजात वाढत्या नैराश्या मुळे भविष्य उद्ध्वस्त होत आहे.

तसेच घरातील महिला वर्गाला सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या व्यसनंपायी घरा मध्ये कलह, भांडणे, इत्यादि दुविधां.

शहरात एखाद्या तरुणाने आत्महत्या केली तर पोलिस फक्त मर्ग दाखल करतात या मागचा मुख्य हेतू काय होता हे कोणाला समजत नाही. तसेच तो कधी पुढे हि येत नाही.

शहरात कित्येक तरुणांनी मागील काही काळात आत्महत्या केली आहे,हे शहराला माहित आहे.

हे सगळं माहीत असताना सुद्धा जर सत्ताधारी नेते व कथित समाजसेवक या अवैध धंद्यांना पाठिंबा देत असतील व अवैध धंदे तेच चालवत असतील तर तेच शहराला सरळ सरळ अंधारात ढकलत आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही.

कथित समाजसेवा,राजकीय फायदा : निवडणूक खर्च व सत्तेचा बाजार

सर्वात गंभीर प्रश्न असा आहे की—

या धंद्यांमध्ये कोणाची पार्टनरशिप आहे?

निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हे धंदे सुरू होते की सुरू आहेत?

राजकीय नेत्यांना महिन्याचा “हफ्ता” मिळतो का की पार्टनरशिप?

म्हणूनच विरोधात गेलेल्यांवर कारवाई आणि जवळच्यांना मोकळीक?

जर असे असेल, तर हे केवळ कायद्याचे अपयश नाही,तर लोकशाहीची थट्टा आहे.

पोलीस यंत्रणा : कायद्याची रक्षक की राजकीय नोकर?

या सगळ्या विचित्र चित्रा मध्ये पोलीस यंत्रणेची भूमिका येथे संशयाच्या भोवऱ्यात आहे.

धंदे सर्रास असूनही कारवाई होत नाही?

काही ठिकाणी अचानक छापे, काही ठिकाणी पूर्ण दुर्लक्ष, आदेश येतात कुठून?

कायद्याकडून की राजकिय नेत्यानं कडून?

जर पोलीस फक्त राजकीय हस्तक्षेपानेच काम करत असतील,

तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे?

“शहरात वरली – मटका – गुटखा खुलेआम सुरू असताना आमदार हरीश पिंपळे यांचे सुद्धा मौन संशय निर्माण करणारे आहे, लोकांना वाढदिवसाचा शुभेच्छा देताना आरोग्या बद्दल शुभेच्छा देणारे आमदार यांचा नियंत्रणाचा अधिकार असूनही कारवाई का दिसत नाही?”

“मुर्तिजापूर अंधारात जात असताना आमदार हस्तक्षेप करणार की राजकीय सोयीसाठी व आपल्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यासाठी या अवैध धंद्यांकडे त्यांची डोळेझाक सुरूच राहणार?”

कटु प्रश्न असा की : मुर्तिजापूर शहर राजकीय व सामाजिक दृष्ट्या कुठे चालले आहे?

संवैधानिक पदांवर बसलेले नेते जर

अवैध धंद्यांना संरक्षण देत असतील,

तरुण पिढीला जुगार व इतर व्यसनान कडे ढकलत असतील,

आणि पोलीस यंत्रणेला बाहुलं बनवत असतील—तर उद्या या शहरात काय उरेल?

विकास? की व्यसन?

संस्कृती? की सट्टा?

युवा बळकटीकरण? की गुटखा?

आणि सगळ्यात महत्त्वाचे

गुटखा माफियान वर माकोका लावण्याची तयारी पोलिस प्रशासनाची आहे का?

मुर्तिजापूरला कायदा हवा आहे, राजकीय सौदेबाजी नाही.

आज प्रश्न विचारला नाही, तर उद्या उत्तर देण्याची वेळ येईल.

आणि ते उत्तर फार भयंकर असेल.

आजची सत्ता आणि हफ्ता हा शहारासाठी भयानक वास्तव्य आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!