Join WhatsApp group

Ads

जुने शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सहा जणांना अटक, दोन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

March 5, 2026 8:06 am

Ads


अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा आरोपींना रंगेहात अटक केली. आरोपींकडून रोख रक्कम, ताशपत्ते तसेच महागडे मोबाईल फोन असा एकूण २ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस उपनिरीक्षक योगेश सुधाकर चव्हाणके यांना ४ मार्च २०२६ रोजी कर्तव्यावर असताना विश्वसनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, देशपांडे प्लॉट, गल्ली क्रमांक २, हमजा प्लॉट, जुने शहर येथील मोहम्मद रहेमान मोहम्मद इब्राहीम यांच्या घरात काही इसम ‘तीन पत्ती परेल’ नावाचा जुगार पैशांवर हार-जीत लावून खेळत आहेत. या खात्रीशीर माहितीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांना बोलावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि पोलिस पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळी धाड टाकली.


दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास संबंधित घराच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये सहा जण गोलाकार बसून पैशांवर जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची नावे व पत्ते विचारून अंगझडती घेतली.


अटक करण्यात आलेल्यांमध्ये कामरान खान अजांर खान (वय २६), सुनील श्यामचरण सारखाण (वय ५०), अनिल गौतमदास चांडक (वय ६१), शेख रुकसार शेख इद्रीस (वय ३१), मोहम्मद मजहर नूर मोहम्मद (वय २९) आणि रिजवान खान इस्माईल खान (वय ३५) यांचा समावेश आहे. आरोपींकडून एकूण २७,८०० रुपये रोख रक्कम तसेच प्रत्येकी तीन ताशपत्ते जप्त करण्यात आले. याशिवाय घटनास्थळावरून ३४ ताशपत्तेही जप्त करण्यात आले.


तसेच विविध कंपन्यांचे सहा अँड्रॉइड मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण अंदाजे किंमत १ लाख ८६ हजार रुपये आहे. रोख रक्कम व मोबाईलसह एकूण २ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.


चौकशीत संबंधित घर हे मोहम्मद रहेमान मोहम्मद इब्राहीम यांचे असल्याचे निष्पन्न झाले. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शहरातील अवैध कृत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!