Join WhatsApp group

Ads

शेतात अफूच्या झाडांची लागवड, पोलिसांना खबर, शेतकऱ्याला अटक

By Sarkar Maza

March 1, 2026 7:28 am

Ads

 भादे गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

SARKAR MAZA NEWS ROOM :

सातारा : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या निर्मिती आणि तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलिसांनी आज अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली आहे. भादे गावातील शेतकऱ्याने त्याच्या शेतात लागवड केलेली 2 लाखांची अफूची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी शेत मालक अशोक दगडू गायकवाड (वय 63) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भादे गावात अशोक गायकवाड या शेतकऱ्याने त्याच्या शेतात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना खबऱ्याकडून मिळाली. भादे गावातील सिध्देश्वर मंदीराजवळच्या मळा नावाच्या शिवारात दोन ठिकाणी प्रतिबंधित अफिमची (अफू) लागवड करण्यात आली होती. याबाबतची माहिती फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे यांना देण्यात आली.

पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, उपनिरिक्षक शंकर पांगारे, अंमलदार सुधाकर सूर्यवंशी, नितिन नलवडे, गिरिश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, होमगार्ड अजय मोरे, संतोष इंगवले, प्रशांत चव्हाण हे फॉरेन्सिक टीम आणि शासकीय पंचासह घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने २ लाख रुपये किमतीची ७ किलो ९१५ ग्रॅम अफू जप्त केली.

खंडाळ्याचे नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या समक्ष अफूची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अशोक दगडू गायकवाड याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्याला खंडाळा न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अंमलदार अक्षय बगाड यांनी फिर्याद दिली असून उपनिरिक्षक शंकर पांगारे हे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत अथवा उत्पादनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी शिरवळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे अवाहन शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!