Join WhatsApp group

Ads

ऑपरेशन प्रहारचा धडाका : जुगार, अवैध दारू व कुख्यात गुंडावर निर्णायक कारवाई,११ आरोपी ताब्यात, ₹१.११ लाखांचा मुद्देमाल जप्त; धोकादायक गुंड एमपीडीएखाली स्थानबद्ध

By Sarkarmzanews

December 31, 2025 8:33 pm

Ads

अकोला : दिनांक ३१ :नववर्षाच्या पूर्वसंध्येला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोला पोलिसांनी एकामागोमाग एक निर्णायक कारवाया करत जुगार, अवैध दारूविक्री आणि सराईत गुन्हेगारीवर मोठा आघात केला आहे.
जुगार अड्ड्यांवर छापे : ११ आरोपी ताब्यात
मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित (अचिंत) चांडक यांच्या निर्देशानुसार दिनांक ३०/१२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी पोलीस स्टेशन बोरगाव मंजू हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले.
पहिली कारवाई ग्राम दहीगाव गावंडे येथे शेतालगत सार्वजनिक ठिकाणी वरली मटक्यावर पैशांची हार-जीत लावून जुगार खेळणाऱ्यांविरोधात करण्यात आली. या ठिकाणी ९ आरोपी ताब्यात घेण्यात आले असून १ आरोपी फरार आहे.
दुसरी कारवाई बोरगाव मंजू बस स्टँड चौक येथे “फन एशिया” वेबसाईटद्वारे एलसीडी/एलईडी टीव्हीवर ऑनलाइन जुगार खेळवणाऱ्या टोळीवर करण्यात आली. येथे २ आरोपी ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार फरार आहे.
या दोन्ही कारवायांतून रोख रक्कम, मोबाईल फोन, एलसीडी/एलईडी टीव्ही, संगणक साहित्य, कॅलक्युलेटर व जुगाराच्या चिठ्ठ्या असा एकूण ₹१,११,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई
याच पार्श्वभूमीवर अकोला शहरातील लेबर कॉलनी, कृषी नगर येथील आकाश उर्फ करण विनोद धुंकेकर (वय २४) या २१ व्या धोकादायक गुंडास एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्र वापर, धमकी अशा गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेल्या या गुंडावर पूर्वीची प्रतिबंधक कारवाई निष्फळ ठरल्याने मा. जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी दिनांक ३०/१२/२०२५ रोजी स्थानबद्धतेचा आदेश दिला. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून आरोपीस अकोला जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले.


अवैध दारूविक्रीवर धडक : ₹१.१२ लाखांचा माल जप्त
दरम्यान, दिनांक ३१/१२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन दहिहांडा हद्दीत अवैध दारूविक्रीविरोधात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत देशी दारूच्या ४५० बॉटल्स, दोन दुचाकी वाहने असा एकूण ₹१,१२,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलीस दलाचे संयुक्त प्रयत्न
सदर सर्व कारवाया मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय व स्थानिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.


“निवडणूक काळ, सण-उत्सव व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या, कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए व इतर कठोर कायद्यांतर्गत पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!