Join WhatsApp group

Ads

निष्ठावंत नेत्यांचा संयम सुटतोय? मूर्तिजापूरात शरद पवार गटाची ताकद कमी

By Sarkarmzanews

January 7, 2026 9:37 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक०७ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाची मूर्तिजापूर तालुक्यातील संघटनात्मक ताकद अलीकडच्या काळात कमी होत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी काही पदाधिकारी पक्षांतराच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुकास्तरावर पक्षाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पक्षाशी निष्ठावंत राहिलेले विष्णू लोडम यांनी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष तसेच विधानसभा निरीक्षक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या.

पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच विधानसभा, लोकसभा व राज्यसभा निवडणुकांच्या नियोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने विष्णू लोडम यांच्या पत्नी यांना प्रभाग क्रमांक १२ मधून उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत मान-सन्मान दिला होता, हेही उल्लेखनीय आहे.

तरीदेखील पक्षातील अंतर्गत असमाधान, वाढती गळती आणि नेतृत्वाबाबत निर्माण झालेली नाराजी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून हा राजीनामा पाहिला जात आहे.

विष्णू लोडम यांच्या मृदू स्वभावामुळे व संघटन कौशल्यामुळे तालुक्यातील मोठा ओबीसी कार्यकर्ता वर्ग पक्षाशी जोडला गेला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

दरम्यान, विष्णू लोडम यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, ते भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र सामाजिक-राजकीय वाटचाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!