Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर शहर पोलिसांची ऐतिहासिक कारवाई : गुंगीकारक औषधांचा काळाबाजार उघड.

By Sarkarmzanews

December 30, 2025 11:07 am

Ads

मुर्तिजापूर | दिनांक : ३० : गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित औषधांची विनापरवाना खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात मुर्तिजापूर शहर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत मोठा औषधसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण १ लाख २६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


सदर कारवाई पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर, जिल्हा अकोला येथे गुन्हा क्रमांक 590/2025 अन्वये नोंदविण्यात आली आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार व ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत करण्यात आली.


दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार हे पोलीस पथकासह शहरात पेट्रोलिंग करत असताना, नवीन घरकुल, जुनी वस्ती परिसरात अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा साठा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे शासकीय पंच व फोटोग्राफर यांना बोलावून घटनास्थळी छापा टाकण्यात आला.


छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गुंगीकारक व मुद्दबाह्य औषधांचा साठा आढळून आला. यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मनीष विश्वास गोतमारे यांनी दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी पाहणी केली असता आरोपीकडे वैध परवाना नसताना औषधांची साठवणूक व विक्री केल्याचे निष्पन्न झाले.


पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यात अंदाजे १,१९,३०७ रुपये किमतीची विविध औषधे तसेच नायट्रोजन 10 एमजीच्या 1000 प्रतिबंधित गोळ्या (₹7,313) असा मुद्देमाल असून एकूण किंमत ₹1,26,620 आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव जुनेद खान मेहबूब खान (वय 29), राहणार रोशनपुरा, जुनी वस्ती, मुर्तिजापूर, तर दुसरे आरोपी एस.पी. कॉर्पोरेशन, अकोला चा संचालक असल्याचे समोर आले आहे.


आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 278, तसेच एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(c), 22(a) आणि औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक आशिष शिंदे यांनी गुप्त भूमिका बजावली. तसेच कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, नंदकिशोर टिकार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे, कृष्णा येरमुले, सचिन दुबे, गजानन खेडकर, ज्ञानेश्वर राणे, पवन बोडखे, रोहिणी शिरभाते, यांचा सहभाग होता.


सध्या आरोपीस अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करीत आहेत. शहरात गुंगीकारक औषधांच्या अवैध व्यवहाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या ठोस कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!