Join WhatsApp group

Ads

-

जुने शहरात जुगार अड्ड्यांची पुन्हा एन्ट्री; ‘रहमान-रहीम’ला राजकीय राम कवच?

By Sarkar Maza

February 17, 2026 4:56 pm

Ads

अकोला : दिनांक १७ : मनपा निवडणुकीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचे ढोल बडवणारे नेते आणि धडक कारवाईचे आश्वासन देणारी यंत्रणा, निकाल लागल्यानंतर मात्र गायब झाली का? असा संतप्त सवाल जुने शहरात पुन्हा ऐकू येत आहे. जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील सोनटक्के प्लॉट आणि चांदखां प्लॉट परिसरात जुगार अड्डे उघडपणे सुरू असल्याची चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिकांमध्ये या अड्ड्यांचा सूत्रधार म्हणून “रहमान-रहीम” या नावाची जोरदार चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी “जुगार बंद नाही झाला तर एसपी ऑफिसवर मोर्चा!” अशी दमदार भूमिका घेणारे काही राजकीय नेते अचानक शांत का झाले, असा उपरोधिक प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्या काळात काही दिवस कारवाईचा देखावा झाला, अड्डे बंद झाल्याचा आभास निर्माण झाला; मात्र निवडणूक संपताच पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

कारवाई का थांबली?

जुगार अड्डे उघडपणे सुरू असल्याची चर्चा असताना स्थानिक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
“अड्डा इतका बेधडक सुरू आहे की जणू परवानाच घेतला आहे!” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे—वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे का? की या अड्ड्यांना राजकीय संरक्षण मिळत आहे?

सामान्यांवर कारवाई, अड्ड्यांवर मूकसंमती?

किरकोळ कारणांवरून सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई होते; मग जुगारासारख्या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष का? कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा रोखठोक सवाल शहरवासीय विचारत आहेत.

नागरिकांची मागणी

या जुगार अड्ड्यांवर तात्काळ छापे टाकून रहमान-रहीमसह संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

निवडणुकीपूर्वीचा धाक फक्त प्रचारापुरताच होता का, की आता जुगाराला राजकीय संरक्षण मिळाले आहे?
जुने शहरात सध्या हाच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!