Join WhatsApp group

Ads

नगरपालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम घोळ, उमेदवाराचं नाव गायब; सात अधिकारी निलंबित

By Sarkarmzanews

December 24, 2025 10:36 pm

Ads

भंडारा : दिनांक २५ : भंडारा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये गंभीर स्वरूपाचा घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मतमोजणीदरम्यान एका उमेदवाराचं नाव आणि नोटाचा पर्याय ईव्हीएमवर दिसून न आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी प्राथमिक चौकशीनंतर सात अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार करुणा राऊत यांनी निवडणूक लढवली होती. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी सुरू असताना त्यांच्या नावासमोरील बटन आणि नोटाचा पर्याय ईव्हीएममध्ये नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांच्या मतांची नोंद होत नसल्याचा प्रकार समोर आला.

या घटनेनंतर करुणा राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी याबाबत आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मतदानाच्या वेळी उमेदवाराचं नाव मशीनवर होतं, मग मतमोजणीच्या वेळी ते कसं गायब झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ईव्हीएम तयार करताना गंभीर चूक झाल्याचं निष्पन्न झालं. सदस्य 3 अ पदासाठी एकूण पाच उमेदवार आणि एक नोटा असे सहा पर्याय आवश्यक असताना, बॅलेट युनिट तयार करताना उमेदवार क्रमांक 5 आणि 6 यांची नावं झाकली गेली होती. परिणामी प्रत्यक्ष मतदान फक्त चार उमेदवारांसाठीच उपलब्ध झालं.

या प्रकरणी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी स्पष्ट केलं की, मतदानानंतर ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. ही चूक ईव्हीएमची सेटिंग, सिलिंग किंवा बॅलेट पेपर लावताना झाली असण्याची शक्यता आहे. तसेच या चुकीचा अंतिम निकालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित उमेदवाराला एकूण 467 मतं मिळाली असून विजयी उमेदवार सुमारे एक हजार मतांनी विजयी झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीने निकाल जाहीर करण्यात आला असून, या गंभीर निष्काळजीपणाबद्दल संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये तीन शिक्षक आणि चार अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अन्य पक्षांसोबत मिळून भंडाऱ्यात मोर्चा काढण्याच्या तयारीत असून, न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एका ठिकाणी अशी चूक झाली असेल तर इतर ठिकाणीही ती झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित प्रभागात पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!