Join WhatsApp group

Ads

राज्यातील प्रत्येक शहराचा होणार सर्वांगीण विकास : मुख्यमंत्री फडणवीस

By Sarkarmzanews

January 4, 2026 8:49 pm

Ads

अकोला : दिनांक ४ : महाराष्ट्र हे देशातील नागरिकरण झालेल्या राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून ग्रामीण भागासोबतच आता शहरांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आम्ही साकारत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी खेड्यांचा विकास साधला आणि आता शहरी विकासाची नवी वाट उघडली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, आवश्यक तेवढा निधी आणि सविस्तर नियोजन आमच्याकडे तयार आहे. येणाऱ्या काळात राज्यातील प्रत्येक शहराचा वेगाने विकास होताना दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महानगरातील नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि विकासदृष्टी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने ‘महाविकास संकल्पनामा’ तयार केला आहे. या संकल्पनाम्याचे प्रकाशन रविवारी क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित भव्य जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. मात्र ही योजना सुरू होती, सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. ‘जोपर्यंत देवाभाऊ आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य मिळतच राहील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून उन्नती घडवून आणण्यासाठी ‘उमेद’ अभियान अधिक बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद भवन’ उभारून बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांची अधिकृत विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.


तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून ३० लाख घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, ज्या नागरिकांनी एखाद्या जागेवर वास्तव्यासाठी झोपड्या किंवा बांधकाम केले आहे, त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येणार आहेत. राज्यातील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत आमदार रणधीर सावरकर यांनी ठेवलेले ६० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट निश्चित गाठले जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. सभेत भाजपाचा ‘महाविकास संकल्पनामा’ प्रकाशित करण्यात आला. या सभेला पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, माजी मंत्री दशरथ भांडे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, गिरिश जोशी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!