Join WhatsApp group

Ads

सूर्यास्तानंतर बंदी असतानाही घाटांवर मशीनांचा गडगडाट; महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात?

By Sarkar Maza

April 20, 2026 6:34 pm

Ads

मुर्तिजापूर: तालुक्यातील काही नदीपात्रांमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक हा प्रकार दिवसेंदिवस बिनधास्तपणे वाढत असून, आता तो उघडपणे रात्रीच्या अंधारात सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने स्पष्टपणे सूर्यास्तानंतर वाळू उपसण्यावर बंदी घातली असतानाही, काही घाटांवर मात्र नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. परिणामी ‘वाळू माफिया’ प्रशासनालाच आव्हान देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी एका वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आज बोरगांव मंजू पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. हा प्रकरण रात्रीचा वेळेस चालणाऱ्या वाळू माफियांचा जिवंत उदाहरण ठरले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ नंतर नदीकाठावर ट्रॅक्टर, डंपर आणि जेसीबी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होते. अनेक ठिकाणी दिवसभर नियमाने असलेले घाट रात्री अचानक बेकायदेशीर जिवंत होतात.

मशीनच्या आवाजाने परिसर दणाणून जातो, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईट्स लावून वाळू उपसा केला जातो. हा सर्व प्रकार इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने चालतो की, कारवाईची शक्यता टाळण्यासाठी माफियांनी स्वतंत्र ‘सिस्टम’ तयार केल्याचे बोलले जात आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रात्रीचा वेळेस बिगर रॉयल्टी वाळू वाहतूक खुलेआम सुरू असूनही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे “महसूल विभागाला माफिया चुना लावत आहेत की काही अधिकाऱ्यांचे मौन संगनमत आहे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वारंवार कारवाई करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

दरम्यान, या बेकायदेशीर उपशामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. तज्ञांच्या मते, अति वाळू उपसा केल्याने नदीची नैसर्गिक रचना बिघडते, पाण्याची पातळी खाली जाते आणि भविष्यात पाणीटंचाईसारखे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तसेच नदीकाठच्या शेतीवरही याचा विपरीत परिणाम होत असून, भूस्खलनाचा धोका वाढत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी रात्रीच्या वेळी ‘पहरेकरी’ ठेवले जातात, जे प्रशासनाच्या हालचालींची माहिती माफियांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे कारवाई होण्यापूर्वीच सर्व यंत्रणा गायब केली जाते. हा प्रकार केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून, मोठ्या साखळीच्या स्वरूपात चालत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, काही वेळा कारवाईचे नाटक केल्याचेही आरोप होत आहेत. एखादा ट्रॅक्टर पकडला जातो, मात्र मुख्य सूत्रधारांवर हात टाकला जात नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे लहान वाहनचालकांवर कारवाई करून मोठ्या माफियांना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे.

मुर्तिजापूर तालुक्यात सुरू असलेली ही बेकायदेशीर वाळू वाहतूक केवळ महसूल तोट्याचा मुद्दा नाही, तर पर्यावरण, कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन ‘वाळू माफिया’वर कडक कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फोटो – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!