Join WhatsApp group

Ads

-

३०० रुपये रोज भाडे, नियमांना हरताळ; मुर्तिजापूरमध्ये अतिक्रमण बळावले

By Sarkarmzanews

February 4, 2026 5:56 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०४ : शहरात अतिक्रमण ही दिवसेंदिवस गंभीर समस्या ठरत असून, नागरिकांसाठी ती डोकेदुखी बनली आहे. अतिक्रमण केवळ रस्त्यांपुरते मर्यादित न राहता आता थेट नगरपरिषद संकुल, प्रमुख बाजारपेठा आणि सार्वजनिक जागांमध्येही वाढले आहे.

शहरातील काही व्यक्तींनी अतिक्रमण करून उभारलेले खोके स्वतः वापरण्याऐवजी ते इतरांना दररोज सुमारे ३०० रुपये रोज भाड्याने दिल्याचे प्रकार समोर आले आहेत.

कोणताही अधिकृत करार किंवा परवानगी नसताना सुरू असलेला हा व्यवसाय प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

विशेष म्हणजे शहरातील अनेक ठिकाणी “नो हॉकर्स झोन”चे फलक लावलेले असतानाही, हे फलक केवळ शोभेपुरतेच उरले आहेत.

या फलकांवरच तिरपाल टाकून खुलेआम व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसून येत असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे.

नगरपरिषद संकुलातील काही दुकानदारांनी दुकानाबाहेर शेड टाकून व्यवसाय थाटल्यामुळे नागरिकांना पार्किंगची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

परिणामी पार्किंग रस्त्यावरच होत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.दरम्यान, शहरातील बुद्धिजीवी व सजग नागरिकांनी यावर ठोस उपाय सुचवले आहेत.

त्यांच्या मते,स्टेशन परिसरातील हॉकर्स झोन व रस्त्यावर बसलेले भाजी विक्रेते यांना बस स्थानकाच्या मागील जागेत स्थलांतरित करावे, तसेच जुनीवस्ती परिसरातील हॉकर्स झोन आठवडी बाजाराच्या जागेत नियोजनबद्ध पद्धतीने हलवावे, जेणेकरून रस्ते मोकळे राहतील आणि नागरिकांची गैरसोय टळेल.

प्रत्येक व्यवसायिकाला दुकान विकत घेणे शक्य नसते, हे वास्तव असले तरी गरजू व्यावसायिकांसाठी नियोजित हॉकर्स (आकाश) झोन उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे.

मात्र अतिक्रमण हटवण्याऐवजी, अतिक्रमणधारकांकडून दररोज शुल्क वसूल करून महसूल गोळा करण्याचा प्रयत्न होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता शहरात एकच प्रश्न उपस्थित होत आहे —

“अतिक्रमणमुक्त मुर्तिजापूर शहर प्रत्यक्षात कधी?”

नगराध्यक्ष हर्षल साबळे व शहरातील नगरसेवक अतिक्रमण हटवून, गरजू व्यावसायिकांना नियोजित हॉकर्स झोन उपलब्ध करून देण्यासाठी ठोस निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!