Join WhatsApp group

Ads

‘नगरसेवक’ की ‘अतिक्रमणधारक’? शहरात राजकीय वाद पेटला

By Sarkar Maza

April 13, 2026 11:27 am

Ads

अवैध बांधकाम प्रकरण पेटणार? नियमांनुसार दोष सिद्ध झाल्यास नगरसेवक पद गमावण्याची शक्यता

मुर्तिजापूर शहरात सध्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, धक्कादायक बाब म्हणजे शहरातीलच २५ नगरसेवकांपैकी तब्बल ४ ते ५ नगरसेवक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संबंधित नगरसेवकांनी अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत काही जागरूक नागरिकांनी अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत, तर आणखी काही तक्रारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

या घडामोडींमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, “जनतेचे प्रतिनिधीच नियम मोडत असतील, तर सामान्य नागरिकांनी काय करावे?” असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि कारवाई कितपत निष्पक्ष होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणात केवळ अतिक्रमणाचाच मुद्दा नसून, शहरातील कोणती राजकीय शक्ती संबंधित नगरसेवकांना वाचवण्याचा प्रयत्न करते का, याकडेही बारकाईने पाहणे गरजेचे ठरणार आहे. तसेच, आर्थिक व्यवहारांचा आधार घेऊन प्रकरण दडपण्याचा किंवा त्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न होतो का, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. जर असे प्रकार घडले, तर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

अपात्रतेचे नियम काय सांगतात?

महाराष्ट्र महानगरपालिका/नगर परिषद कायद्यानुसार, एखाद्या नगरसेवकाने जाणीवपूर्वक अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण केल्याचे सक्षम प्राधिकरणाकडून सिद्ध झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

संबंधित बांधकाम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यास ते तोडण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

तसेच, हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of Interest) किंवा कायद्याचे उल्लंघन सिद्ध झाल्यास, नगरसेवकाला अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाकडे याबाबत प्रस्ताव जाऊन, चौकशीअंती संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असते.

दरम्यान, या तक्रारींवर प्रशासनाकडून चौकशी सुरू झाल्यास शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. “कायद्यापुढे सर्व समान” हे तत्व खरोखरच लागू होते की नाही, याची खरी परीक्षा आता होणार आहे.

आता येणाऱ्या काळात या प्रकरणाचे पडसाद किती तीव्र उमटतात आणि कोणावर कारवाई होते, याकडे संपूर्ण मुर्तीजापुरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!