Join WhatsApp group

Ads

मुख्याधिकाऱ्यांचा आदेश; नातेवाईकराजाला लगाम

By Sarkarmzanews

January 31, 2026 2:17 pm

Ads

मुर्तिजापूर: दिनांक ३१: नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरात नगरपरिषद कामकाजाबाबत एक वेगळे चित्र दिसून येत आहे. महिला नगरसेवकांचे पती तसेच काही नगरसेवकांचे नातेवाईक स्वतःलाच नगरसेवक असल्याप्रमाणे जनतेमध्ये वावरत असून, नगरपरिषद संबंधित कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

याबाबत सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात असून, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
या प्रकाराबाबत स्वीकृत नगरसेवक राम जोशी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करत आक्षेप नोंदवला होता. निवेदनाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कडक आदेश काढले आहेत.

जाहीर आदेशानुसार, कोणत्याही नगरसेवकाचे पती, पत्नी किंवा नातेवाईक यांना नगरपरिषद कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे. नगरपरिषद कामकाजात केवळ निवडून आलेले नगरसेवकच अधिकृत प्रतिनिधी असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक संवेदनशील ठरत आहे. महिलांना थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याच्या उद्देशाने आरक्षण देण्यात आले असताना, प्रत्यक्षात नातेवाईकांमार्फत कारभार होत असल्यास आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच बाधा निर्माण होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

नगरसेवक हे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने दिलेल्या विश्वासाचे प्रतीक असून, त्यांचे अधिकार कायद्याने निश्चित केलेले आहेत. नगरसेवक पदाची गरिमा अबाधित ठेवणे, तसेच लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता नगरपरिषद कार्यक्षेत्रात शिस्त निर्माण होणार की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!