Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुर नाफेडमध्ये ‘तोंड पाहून’ सोयाबीन खरेदीचा आरोप, शेतकऱ्यांचा संताप

By Sarkarmzanews

December 26, 2025 12:39 pm

Ads

मुर्तीजापुर (दिनांक २६ ) – मुर्तीजापुर येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर २५ डिसेंबर रोजी खरेदी प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे. ‘तोंड पाहून’ म्हणजेच काही निवडक शेतकऱ्यांचाच माल खरेदी केला जात असून, अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमांनुसार आणलेला सोयाबीनचा माल असूनही तो स्वीकारला जात नसल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, स्वच्छ, कोरडा व निर्धारित प्रतिचा माल आणूनही कधी ओलावा तर कधी गुणवत्तेचे कारण पुढे करून माल नाकारला जात आहे. मात्र त्याच वेळी इतर शेतकऱ्यांचा तत्सम माल स्वीकारला जात असल्याने खरेदी प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवसभर खरेदी केंद्रावर थांबूनही माल विक्री न होता परत जावे लागत आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, मजुरी व वेळ वाया जात असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरेदी केंद्रावर यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून तणावही वाढताना दिसत आहे.

दरम्यान, नाफेड प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावत खरेदी प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला आहे. “ऑनलाईन नोंदणी, टोकन प्रणाली, गुणवत्ता तपासणी व ओलावा मोजणीच्या आधारेच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. निकष पूर्ण न करणारा माल स्वीकारणे शक्य नाही,” असे नाफेड अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेवर तात्काळ लक्ष घालून खरेदी प्रक्रियेतील पारदर्शक प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी, तसेच सर्व शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी ठाम मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!