Join WhatsApp group

Ads

अकोट फैलमध्ये खळबळ : खुनाच्या आरोपीला अवघ्या दोन तासांत पोलिसांची शिताफीने अटक

By Sarkar Maza

March 5, 2026 8:01 am

Ads

अकोला (प्रतिनिधी) – अकोट फैल परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून शिताफीची कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी श्रीमती भारती हिरालाल धमेरीया यांनी अकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या घराजवळ आरोपी रितीक अनिल बिहुणे व त्याचा चुलत भाऊ विनीत विजय बिहुणे राहत होते. आरोपीला दारू पिण्याची सवय असून तो नेहमी दारूच्या नशेत विनीतला त्याच्या नावावरील घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी आपल्या लहान मुलांसोबत होळीच्या सणानिमित्त रंग खेळत असताना आरोपी रितीक बिहुणे दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला. त्याने मोबाईलवर फोटो काढण्याच्या कारणावरून वाद घालत फिर्यादीवर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुमारे ७ वाजता त्यांच्या मुलीचा फोन आला. तिने सांगितले की, रितीक आणि विनीत यांच्यात वाद झाला असून रितीकने विनीतवर चाकूने हल्ला केला आहे.

फिर्यादी घरी परतल्यावर शेजारी भारत शुक्लवारे व त्यांची पत्नी प्रीती शुक्लवारे यांनी सांगितले की, घराच्या नावावरून झालेल्या वादातून आरोपी रितीक बिहुणे याने विनीत बिहुणे यांच्या डाव्या छातीवर चाकूने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत विनीतला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३००/२०२६ अंतर्गत कलम १०३(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम यांनी विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी भोपालला मावशीकडे पळून जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने सापळा रचून रेल्वे स्टेशन परिसरातून अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेतले.

या कारवाईत
एएसआय अनिस पठाण, संतोष चिंचोळकर, योगेश काटकर, लीलाधर खंडारे, गिरीश तिडके यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराय करीत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!