Join WhatsApp group

Ads

अकोला जिल्ह्यातील धोकादायक इसमावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षासाठी स्थानबद्ध

By Sarkarmzanews

February 10, 2026 8:48 am

Ads

अकोला : अकोला जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व गोवंश चोरी प्रकरणातील आरोपी शेख रेहान शेख रशीद (वय २२, रा. पिंजारी गल्ली, मच्छी मार्केट परिसर, अकोला) यास महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

शेख रेहान शेख रशीद याच्याविरुद्ध यापूर्वी गोवंश जनावरांची चोरी, जनावरांना ठार मारणे किंवा विकलांग करणे, गुन्ह्यांचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, चुकीची माहिती देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तसेच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

मात्र, या कारवाईचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्याच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्यास एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अकोला यांच्याकडे सादर केला होता.

जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतंत्र माहितीच्या आधारे सदर व्यक्ती धोकादायक असल्याची खात्री झाल्यानंतर दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यास एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेऊन आदेशाची अंमलबजावणी करत त्यास ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोला जिल्हा कारागृहात दाखल केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पूर्ण केली.

दरम्यान, आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व पोलिस कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए तसेच इतर प्रचलित कायद्यांन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!