Join WhatsApp group

Ads

डीजेच्या दणदणाटाविरोधात मूर्तिजापूरात सजग जनमानस आक्रमक!

By Sarkarmzanews

September 16, 2026 9:36 am

Ads

एसडीओ–एसडीपीओंसह शहर ठाणेदारांना निवेदन; कर्णकर्कश आवाजाला लगाम घालण्याची मागणी — ‘उत्सव हवा, पण नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर का?’

मूर्तिजापूर | धार्मिक उत्सव असो, महापुरुषांची जयंती असो किंवा सार्वजनिक मिरवणूक… उत्सव साजरा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र या उत्सवाच्या नावाखाली डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश दणदणाटाने सामान्य नागरिकांचे जगणेच असह्य होत असेल, तर उत्सव आणि ध्वनीप्रदूषण यामधील सीमारेषा नेमकी कुठे आहे? असा सवाल आता मूर्तिजापूरातील सजग नागरिकांनी उपस्थित केला आहे.

डीजे-डॉल्बीच्या वाढत्या वापराविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत उपविभागीय अधिकारी (SDO), उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन सादर केले.

कर्णकर्कश आवाजाला आळा घालून ध्वनीप्रदूषणासंदर्भातील न्यायालयीन निर्देश व शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन

या निवेदनावर माधवराव काळे, डॉ. श्रीकांत तिडके, रतनलाल महाजन, डॉ. तुषार बायस्कर, अरविंद तायडे, श्रीकृष्ण बोळे, सुरेश जोगळे, सुरेश तायडे, योगेश कोरडे आणि राजू पाटील वानखडे यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वधर्मीय सार्वजनिक उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात साजऱ्या झाल्याच पाहिजेत; मात्र त्यासाठी इतर नागरिकांचे आरोग्य, शांतता आणि दैनंदिन जीवन बाधित होऊ नये, याचीही जबाबदारी आयोजकांनी घेतली पाहिजे.

पुण्याचा ‘सामाजिक पॅटर्न’ मूर्तिजापूरात?

गेल्या काही दिवसात पुण्यासह विविध शहरांमध्ये ध्वनीप्रदूषण, सार्वजनिक उत्सवातील आवाजाची मर्यादा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता मूर्तिजापूरही त्याच सामाजिक चर्चेच्या वळणावर येत आहे का? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.

विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उत्सवापेक्षा डीजे, डॉल्बी, भव्य मिरवणुका आणि काही ठिकाणी होणारे राजकीय ब्रँडिंग यांचीच अधिक चर्चा होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

उत्सव हा संस्कृतीचा भाग आहे; पण उत्सवाचे स्वरूप ‘आवाज किती मोठा?’ यावर ठरणार की ‘संस्कृती किती समृद्ध?’ यावर? हा प्रश्न युवा पिढीसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.

युवा पिढी संस्कृतीपासून दूर जातेय?

ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, भजन, कीर्तन, सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांची जागा मोठ्या आवाजातील डीजेने घेतली, तर पुढच्या पिढीला आपल्या उत्सवांची खरी परंपरा कोण सांगणार?

उत्सवाच्या नावाखाली राजकीय किंवा वैयक्तिक ब्रँडिंगचा अतिरेक होत नाही ना?धार्मिक भावनेपेक्षा ध्वनीचा दणदणाट महत्त्वाचा होत नाही ना?युवा शक्तीला संस्कृतीशी जोडण्याऐवजी केवळ शक्तिप्रदर्शनाच्या स्पर्धेत ढकलले जात नाही ना?

हे प्रश्न कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नसून सर्व सार्वजनिक उत्सवांना समान नियम लागू करण्याच्या भूमिकेतून नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

आता प्रशासनाची कसोटी!

एसडीओ, एसडीपीओ आणि शहर ठाणेदारांकडे निवेदन देण्यात आल्यानंतर आता प्रशासन प्रत्यक्षात काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ध्वनीची पातळी तपासण्यासाठी यंत्रणा प्रत्यक्ष मैदानात उतरते का?

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होते का?

उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला लगाम बसतो का?

कारण प्रश्न केवळ डीजेचा नाही…

प्रश्न आहे—उत्सवाचा आवाज मोठा असावा की समाजाचा विवेक?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!