Join WhatsApp group

Ads

-

अखेर मुर्तिजापूर तालुक्यातील वीजतार चोर माना पोलिसांच्या ताब्यात!

By Sarkarmzanews

September 12, 2026 7:04 pm

Ads

मूर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजतार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी तसेच महावितरणच्या यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

माना ते जितापूर शेतशिवारातील लघुदाब वाहिनीवरील अॅल्युमिनियमची वीजतार चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा माना पोलिसांनी छडा लावत सहा संशयित आरोपींना अटक केली आहे.

या कारवाईत चोरीची १०१ किलो अॅल्युमिनियमची तार आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन असा एकूण ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.माना पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता पवन पातालबंसी यांच्या तक्रारीवरून २ सप्टेंबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माना ते जितापूर परिसरातील शेतशिवारात लघुदाब वाहिनीच्या विद्युत खांबांवरील अंदाजे १ लाख ७ हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नव्हते, तसेच विशेष तांत्रिक पुरावाही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र माना पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धती, गोपनीय माहितीचे जाळे आणि परिसरातील हालचालींचा बारकाईने अभ्यास करत आरोपींचा माग काढला.

गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. चौकशीत गुन्ह्याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दूल रईस अब्दूल शहीद (४६), भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी (३३), लखन श्रीकृष्ण सूर्यवंशी (२७), धिरज दिलीप पांडे (२६), रुपराव किसनराव टोपे (५६), सर्व रा. नवीन घरकुल, मूर्तिजापूर, अकोला, तसेच शेख आसीम शेख साबीर (२४), रा. सोनौरी, मूर्तिजापूर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडून १०१ किलो अॅल्युमिनियमची तार, अंदाजे किंमत १ लाख ७ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन, अंदाजे किंमत २ लाख रुपये, असा एकूण ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१२ सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींचा MCR मंजूर केल्यानंतर त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे करण्यात आली आहे.

वाढत्या वीजतार चोरीला लागला आळा?

मुर्तिजापूर तालुक्यात मागील काही महिन्यांत शेतशिवारातील विद्युत वाहिन्यांवरील वीजतार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा होती. वीजतार चोरीमुळे केवळ महावितरणचे आर्थिक नुकसान होत नाही, तर शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यावरही त्याचा थेट परिणाम होतो.

त्यामुळे माना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वीजतार चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.या टोळीचा इतर वीजतार चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का? चोरीची तार नेमकी कुठे विकली जात होती? या टोळीमागे आणखी कोणी आहे का? याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड, पोलीस हवालदार सर्वेश कांबे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राणे, जावेद खान आणि प्रमोद हिवराळे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!