Join WhatsApp group

Ads

“बैलजोड्या तहसीलवर; शेतकऱ्यांचा ‘काळा पोळा’!”

By Sarkarmzanews

September 8, 2026 12:49 pm

Ads

मूर्तिजापूर : खरीप पिकांवरील संकट, पावसाची अनियमितता, वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि पीकविम्याच्या प्रश्नावरून मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा असंतोष आता आंदोलनाच्या रूपाने समोर येत आहे. १० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर बैलजोड्यांसह ‘काळा पोळा’ आंदोलन करण्याचा निर्णय प्रगती शेतकरी मंडळाने घेतला असून, तालुक्यात गावोगावी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

पारंपरिक पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा सण. मात्र, यंदा शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पोळ्यालाच आंदोलनाचे प्रतीक बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

पिकांचे नुकसान; पंचनाम्याची मागणी

खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनसह विविध पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही भागांत पिकांची परिस्थिती चिंताजनक असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबतही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. संबंधित तक्रारींची अधिकृत चौकशी करून दोष निश्चित करावा आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

शासनाकडे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

प्रगती शेतकरी मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे.

त्यात—

▪ सरसकट कर्जमाफी करावी

▪ पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम तातडीने द्यावी

▪ नियमानुसार २५ टक्के अग्रिम पीकविमा मंजूर करावा

▪ निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी

▪ नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत द्यावी

▪ पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आवश्यक मदत द्यावी

▪ प्रतिकूल परिस्थितीच्या निकषांनुसार दुष्काळसदृश उपाययोजना कराव्यातअशा मागण्यांचा समावेश आहे.

गावोगावी बैठका; आंदोलनाची तयारी

प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी सभा व जनजागृती सुरू आहे. आंदोलनात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत.

“शेतकरी भीक मागत नाही; तो आपल्या हक्काची मागणी करीत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून ठोस निर्णय घ्यावा,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

१० सप्टेंबरला प्रशासनासमोर कसोटीबैलजोड्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी तहसील कार्यालय परिसरात दाखल होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे १० सप्टेंबरचा ‘काळा पोळा’ प्रशासनासाठीही महत्त्वाचा ठरणार असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

न्यूज फोटो – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!