Join WhatsApp group

Ads

-

शेडमध्ये ‘ज्वालाग्राही’ गुपित! 2.82 लाखांचा साठा सापडला; आता शोध ‘बिग बॉस’चा!

By Sarkarmzanews

September 4, 2026 12:34 pm

Ads

शेड कुणाचे? करारनामा कुणाच्या नावावर? साठ्यामागे नेमके कोण?

बनावट दारूच्या ‘कनेक्शन’चीही तपासात दिशा; राजकीय व्यक्तीच्या कथित सहभागाच्या चर्चेने खळबळ

अकोला : आपातापा गावाच्या हद्दीत शेडमध्ये लपवून ठेवण्यात आलेल्या तब्बल 2,945 लिटर पेट्रोलसदृश पदार्थाचा साठा राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 2.82 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या कारवाईनंतर आता काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.40 वाजता सुरू झालेली कारवाई 2 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.17 वाजता पूर्ण झाली. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

जप्त केलेला साठा बोरगाव मंजू येथील पेट्रोल पंपावर जमा करण्यात आला आहे. या प्रकरणात निरीक्षण अधिकारी विश्वजीत लिंगायत व पुरवठा निरीक्षक तुषार चिंचोले यांनी पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.

मात्र प्रश्न केवळ 2,945 लिटर साठा जप्त करण्यापुरता मर्यादित नाही.

शेड भाड्याने दिले असेल तर करारनामा कुणाच्या नावावर?

ज्या शेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलसदृश साठा आढळला, ते शेड नेमके कोणाच्या मालकीचे आहे? ते भाड्याने देण्यात आले होते का? असल्यास भाडेकरार कोणाच्या नावावर आहे? भाडेकरूने शेडचा वापर कोणत्या कारणासाठी करणार असल्याचे मालकाला सांगितले होते? याची चौकशी झाली आहे का?

एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्वलनशील स्वरूपाचा पदार्थ शेडमध्ये साठवला जात असताना शेतमालकाला किंवा जागामालकाला याची कल्पना होती का? हा देखील तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

‘पेट्रोलसदृश’ पदार्थ नेमका काय?

जप्त करण्यात आलेला पदार्थ नेमका पेट्रोल आहे की इथेनॉल मिश्रित पदार्थ, की अन्य कोणते रसायन, याचा प्रयोगशाळा अहवाल काय सांगतो? त्याची रासायनिक तपासणी झाली आहे का? पदार्थाची गुणवत्ता, रचना आणि वापराचा उद्देश याबाबत अधिकृत अहवाल समोर येणे गरजेचे आहे.

कारण जवळपास तीन हजार लिटरचा साठा सामान्य वापरासाठी लपूनछपून ठेवला जात असेल, तर त्यामागे नेमका उद्देश काय होता, हा प्रश्न निर्माण होतो.

बनावट दारूच्या ‘कनेक्शन’ची शक्यता?

इथेनॉलसारख्या पदार्थाचा बेकायदेशीर मद्यनिर्मितीसाठी वापर होण्याच्या घटना यापूर्वी देशात समोर आल्या आहेत. गुजरातमधील दारू दुर्घटनांनंतर अशा प्रकारच्या रासायनिक पदार्थांच्या अवैध वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

अकोला जिल्ह्यातही काही महिन्यांपूर्वी बनावट देशी दारू निर्मितीचे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे आपातापा येथून जप्त झालेल्या या साठ्याचा बनावट दारू निर्मितीशी काही संबंध आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे.

हा पदार्थ जिल्ह्यातील एखाद्या बनावट दारू निर्मिती करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचणार होता का?

या साठ्याचा यापूर्वी पकडलेल्या बनावट दारू प्रकरणांशी काही संबंध आहे का?

जप्त पदार्थाचा पूर्वी कुठे-कुठे वापर झाला आहे?

हे प्रश्न आता तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहेत.

एवढा मोठा साठा ‘लपवून’ का ठेवला?

2,945 लिटरचा पदार्थ एखाद्या अधिकृत व्यवसायासाठी असेल तर त्याची खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि वापर यासंबंधी कागदपत्रे असणे अपेक्षित आहे. मग हा साठा शेडमध्ये लपवून ठेवण्याची गरज का पडली?

माल कुठून आला? कोण घेऊन आले? कोणाच्या आदेशाने आणला? कोणाला देणार होते? यासाठी पैसे कुणी दिले?

या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

राजकीय ‘कनेक्शन’ची चर्चा; अधिकृत पुष्टी मात्र नाही

दरम्यान, स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणामागे एका राजकीय व्यक्तीचा अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही सूत्रांकडून एका राजकीय पक्षाशी संबंधित तसेच नगरपरिषद पदाधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

मात्र या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे की नाही, हे तपासातूनच स्पष्ट होणे आवश्यक आहे.

तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद साठा ग्रामीण भागातील शेडमध्ये आढळून येतो आणि त्यामागे केवळ एक व्यक्तीच आहे का, की त्यामागे आणखी मोठे नेटवर्क आहे, हा तपासाचा मुख्य विषय ठरला आहे.

आता तपासाची खरी दिशा महत्त्वाची!

या प्रकरणात केवळ साठा जप्त करून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणे पुरेसे ठरणार आहे का? साठ्याचा मालक, पुरवठादार, वाहतूकदार, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य ग्राहक यांची साखळी तपासली जाणार का?

मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची ये-जा, भाडेकरार, खरेदी-विक्रीची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार तपासले तर या ‘गूढ साठ्या’मागील खरी कहाणी समोर येऊ शकते.

2,945 लिटरचा हा साठा केवळ एका शेडपुरता मर्यादित होता की त्यामागे जिल्हाभर पसरलेले मोठे नेटवर्क आहे?

हा प्रश्न आता अकोला जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!