Join WhatsApp group

Ads

दोन अपत्यांच्या घोषणेला तिसऱ्या अपत्याचा ‘ट्विस्ट’; सरनाईक दाम्पत्याच्या पात्रतेवर टांगती तलवार?

By Sarkarmzanews

September 11, 2026 11:47 am

Ads

तिसऱ्या अपत्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी न्यायालयात धाव; निवडणुकीनंतर अचानक उफाळलेल्या प्रकरणाने मुर्तिजापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुर्तिजापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या काळात प्रभाग क्रमांक १ मधील सरनाईक दाम्पत्याची राजकीय चर्चा होतीच. निवडणूक झाली, निकाल लागला, संदिप सरनाईक आणि शुभांगी सरनाईक हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि राजकीय समीकरणे काहीशी स्थिरावल्याचे चित्र दिसत असतानाच आता त्यांच्या नगरसेवकपदाच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अर्ज जिल्हाधिकारी न्यायालयात दाखल झाला आहे. त्यामुळे “आता नेमके हे प्रकरण पुढे आणण्यामागे राजकीय गणित काय?” हा प्रश्न मुर्तिजापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

संजय मनोहर देवीकर यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील संबंधित तरतुदींचा आधार घेत सरनाईक दाम्पत्याला अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. दाम्पत्याने नामनिर्देशनपत्रात दोन अपत्यांची माहिती दिली असताना तिसरे अपत्य असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात लक्षवेधी मुद्दा आरोपापेक्षा त्याचे टायमिंग ठरत आहे.

निवडणुकीत चर्चा, निकालानंतर शांतता… मग अचानक अर्ज का?

निवडणुकीच्या काळात सरनाईक दाम्पत्याची राजकीय सक्रियता आणि त्यांच्या उमेदवारीची चर्चा प्रभागात होती. निवडणूक पार पडली आणि दोघेही विजयी झाले. त्यानंतर अनेक महिने हे प्रकरण राजकीय पातळीवर फारसे पुढे आले नाही. आता अचानक जिल्हाधिकारी न्यायालयात अपात्रतेचा अर्ज दाखल झाल्याने “निवडणूक संपल्यानंतर हा मुद्दा इतक्या उशिरा का पुढे आला?”, “यामागे केवळ कायदेशीर आक्षेप आहे की आगामी राजकीय समीकरणांचीही पार्श्वभूमी आहे?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

अर्थात, या प्रश्नांची उत्तरे सध्या कोणाकडेही अधिकृतपणे नाहीत. त्यामुळे या अर्जामागे निश्चित राजकीय हेतू असल्याचे म्हणणे घाईचे ठरेल. मात्र, राजकारणात टाइमिंगला अर्थ असतो, आणि म्हणूनच या अर्जाने मुर्तिजापूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.

‘तिसऱ्या अपत्याचा’ पुरावा शोधण्याची लढाई?

अर्जदाराने युवराज संदिप सरनाईक नावाचे तिसरे अपत्य असल्याचा दावा केला असून, संबंधित विद्यार्थी अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असल्याचे नमूद केले आहे. शाळेतील प्रवेश नोंद, हजेरी रजिस्टर, जन्मतारखेची कागदपत्रे आणि प्रवेशावेळी सादर केलेले दस्तऐवज न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याउलट सरनाईक दाम्पत्याने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला असून, त्यांना दोनच अपत्ये असल्याचे तसेच नामनिर्देशनपत्रात खरी माहिती दिल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे. अर्जदाराकडे तिसऱ्या अपत्याबाबत कोणताही ठोस शासकीय पुरावा नसल्याचाही त्यांचा दावा आहे.

त्यामुळे आता या प्रकरणाचा केंद्रबिंदू “कोण काय म्हणते?” यापेक्षा “अधिकृत कागदपत्रांत काय आहे?” हा असणार आहे.

देवीकरांचा पुढचा डाव काय?

दरम्यान, राजकीय वर्तुळातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार संजय मनोहर देवीकर हे भविष्यात या प्रकरणात केवळ शाळेच्या नोंदींपुरते मर्यादित न राहता संबंधित कागदपत्रांची अधिक सखोल पडताळणी करण्याची मागणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जन्मनोंद, शाळेतील प्रवेशासाठी सादर केलेली कागदपत्रे आणि इतर अधिकृत अभिलेखांची तपासणी करण्याची मागणी पुढे होऊ शकते, तसेच भविष्यात डीएनए चाचणीची मागणी ही होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

राजकीय चर्चेत मात्र याला वेगळाच रंग चढला आहे. काहींच्या मते हा केवळ कायदेशीर मुद्दा आहे; तर काहींच्या मते यामागे आगामी राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू असू शकते. मात्र या दोन्ही शक्यतांना सध्या अधिकृत दुजोरा नाही.

सरनाईक दाम्पत्याची भूमिका आता निर्णायक

या प्रकरणात सरनाईक दाम्पत्याने जिल्हाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जबाबातून आपली बाजू स्पष्ट केली आहे. अर्जदाराने खोटा व खोडसाळ अर्ज दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला असून, अर्ज फेटाळण्यासोबतच नुकसानभरपाईची मागणीही केली आहे.

त्यामुळे पुढील सुनावणीत अर्जदार कोणते पुरावे सादर करतो, न्यायालय कोणत्या नोंदी मागवते आणि त्या नोंदींमधून काय समोर येते, यावर संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

राजकारणातील ‘तिसरा पत्ता’ कोणाचा?

मुर्तिजापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगू लागली आहे—सरनाईक दाम्पत्या विरोधातील हा अर्ज केवळ कायदेशीर लढाई आहे की राजकीय पटावरचा नवा डाव?

निवडणुकीत चर्चेत असलेले नाव, विजय मिळवल्यानंतर काही काळाची शांतता आणि त्यानंतर अचानक अपात्रतेची मागणी… या घटनाक्रमामुळे राजकीय सस्पेन्स नक्कीच वाढला आहे.

आता प्रश्न फक्त सरनाईक दाम्पत्याच्या पात्रतेचा राहिलेला नाही; या राजकीय पटावर पुढचा पत्ता कोण टाकणार? आणि त्या पत्त्यामागे नेमके कोणते गणित दडले आहे, याकडे मुर्तिजापूरचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

‘सरकार माझा न्यूज’चा प्रश्न :

निवडणूक संपल्यानंतरच हा मुद्दा का पुढे आला? हा निव्वळ कायदेशीर आक्षेप की आगामी राजकारणाची पूर्वतयारी?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!