Join WhatsApp group

Ads

ऑपरेशन प्रहारचा धडाका; जुगार, चोरी अन् गांजाविरोधात LCB ची कारवाई

By Sarkarmzanews

September 10, 2026 6:39 pm

Ads

अकोला : अकोला जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरोधात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सलग कारवायांचा धडाका लावला आहे. अंमली पदार्थ, जुगार आणि चोरीच्या गुन्ह्यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र कारवायांमध्ये संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, गांजा व रोख रकमेसह चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

म्हाडा कॉलनीत जुगारावर छापा; चार आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे छापा टाकला. या कारवाईत अफरोज अली अफसर अली, शेख समीर शेख जलील, जनार्दन किसन वानखडे आणि शेर अली सरवर अली यांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.

दुकान फोडून तांब्याचे भंगार चोरी; ४८ तासांत टोळीचा छडा

रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १२० किलो तांब्याचे भंगार चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत अवघ्या काही तासांत छडा लावल्याचा पोलिसांचा दावा आहे.५ ते ६ सप्टेंबरदरम्यान आकार कॉम्प्लेक्स, बडा गणपती चौक येथील दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता.

याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेख कासम उर्फ गुड्या शेख कवीर, शेख जुनेद शेख निजाम आणि साहेबखान अहमदखान यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत चोरीच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यांच्याकडून सुमारे २ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली.चोरीचा माल विकत घेणारा व्यावसायिक सुनील शांताराम वानखेडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण चार आरोपींना पुढील कारवाईसाठी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लक्झरी बसस्थानकावर गांजाची कारवाई; ८ किलो गांजासह मुंबईतील आरोपी अटक

दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्झरी बसस्थानक परिसरात अंमली पदार्थाविरोधात कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत अयुब सौरभ शेख (वय २८, रा. मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडून ८ किलो २० ग्रॅम ओलसर गांजा, अंदाजे २ लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करून त्याला पुढील तपासासाठी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई तीव्रजुगार, चोरी आणि अंमली पदार्थांच्या कारवायांमुळे शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केल्याचे या सलग कारवायांतून दिसून येत आहे.

विशेषतः गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या तपासामुळे गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सदर कारवाया पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

विविध कारवायांमध्ये सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि अनिल चव्हाण, पोउपनि माजीद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार सहभागी होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!