Join WhatsApp group

Ads

-

अकोला जिल्ह्यात मान्सूनचा दमदार धडाका; शेतकऱ्यांना दिलासा, काही भागात पिकांचे मोठे नुकसान

By Sarkar Maza

June 25, 2026 9:52 am

Ads

अकोला, दि. २५ : गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा, वाढते तापमान आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोला जिल्ह्यात अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली. बुधवारी (दि. २४ जून) दुपारपासून जिल्ह्यातील अकोला, महान, कुरणखेड, मूर्तिजापूर, बोरगाव मंजूसह विविध भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

महान परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

महान आणि परिसरात तब्बल १७ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवारी दुपारी अचानक मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेतशिवारांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीचे बांध फुटले.याचा सर्वाधिक फटका आधीच लागवड केलेल्या बागायती कपाशी पिकांना बसला. अनेक शेतकऱ्यांची कपाशीची पिके वाहून गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी हे अस्मानी संकट अधिकच वेदनादायी ठरले आहे.

जनजीवन विस्कळीत, सखल भाग जलमय

महान परिसरातील अनेक सखल भाग, शाळा-महाविद्यालयांची प्रांगणे तसेच काटेपूर्णा वसाहत पाण्याखाली गेली. नाले ओसंडून वाहिल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचीही गैरसोय झाली.

कुरणखेड परिसरात आनंदाचे वातावरण

कुरणखेड परिसरातही दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. खडका, पैलपाडा, ढगा, कोलंबी, मिर्झापूर, तानखेड आदी गावांमध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक दिवसांनंतर आलेल्या पावसाचा आनंद लहान मुलांनी रस्त्यावर उतरून घेतला, तर शेतकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

मूर्तिजापूर तालुक्यात अमृतधारा

मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे खालावलेली भूजल पातळी आणि आटलेल्या बोअरवेलमुळे निर्माण झालेले जलसंकट या पावसामुळे काही प्रमाणात कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेतही पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.खरीप पेरण्यांना मिळणार वेगया पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यास मदत झाली असून पुढील काही दिवसांत सोयाबीन, तूर, उडीद आणि मुगाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत.

घाईघाईने पेरणी करू नका :

कृषी विभागदरम्यान, जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना पहिल्याच पावसानंतर घाईघाईने पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!