Join WhatsApp group

Ads

---

चंद्रपूरला मिळाले “स्वयंघोषित पंतप्रधान”! सुरक्षा, नियुक्तीपत्र व पिस्तुल परवान्याची पोलिसांकडे मागणी; अर्जामुळे जिल्ह्यात खळबळ

By Sarkar Maza

March 1, 2026 10:17 am

Ads

वरोरा : दिनांक ०१ :

स्वतःला पंतप्रधान असल्याचा दावा

पोलीस अधीक्षकांना पाठविले पत्र

सुरक्षा व पिस्तुल परवान्याची मागणी

वरोरा पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप

वाहनावर “पंतप्रधान – भारत सरकार” स्टिकर

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील महादेव आसेकर या तरुणाने स्वतःला भारताचा पंतप्रधान म्हणून संबोधण्यात यावे, अशी आगळीवेगळी मागणी करत पोलीस प्रशासनाकडे सुरक्षा देण्याची विनंती केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना लेखी अर्ज पाठविला असून या अर्जाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सदर अर्जात आसेकर यांनी “माझी नुकतीच भारताच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे” असा दावा करत अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान पदाला साजेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी आणि पिस्तुल परवाना देण्यात यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

ही मागणी आपण गेल्या अनेक दिवसांपासून करीत असून वरोरा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. याशिवाय वरोरा येथील विद्यमान पोलीस निरीक्षक यांची बदली करून त्यांच्या जागी तांदुलकर मॅडम यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या दाव्याला अधोरेखित करण्यासाठी आसेकर यांनी स्वतःच्या वाहनावर “पंतप्रधान – भारत सरकार” असा स्टिकर लावला असून तो शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. या अनोख्या मागणीमुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून अनेकजण या प्रकरणाकडे विनोदी नजरेने पाहत आहेत.

या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी सदर अर्जामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभर विनोदी चर्चांचा माहोल आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!