Join WhatsApp group

Ads

---

हातगावात कचरा गाड्या फक्त दाखवण्यासाठी? ट्रॅक्टर वापर व टेंडर प्रक्रियेवर संशय

By Sarkarmzanews

December 28, 2025 8:27 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक २८ : हातगाव ग्रामपंचायतीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अद्यापही कायम असून, या प्रकरणावरून संशय आणि चर्चांना अधिकच उधाण आले आहे. बातमीचा परिणाम म्हणून त्याच दिवशी रात्री सुमारे नऊ वाजता दुसरी कचरा गाडी टो करून ग्रामपंचायतीसमोर उभी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायतीसमोर उभ्या असलेल्या दोन्ही कचरा गाड्यांची अवस्था पाहता त्या कोणत्याही परिस्थितीत सुरू होण्याच्या स्थितीत नसल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसून येत आहे.

गाड्यांमध्ये बॅटरी नसणे तसेच दीर्घकाळ देखभाल न झाल्याने या इलेक्ट्रिक गाड्या निष्क्रिय अवस्थेत असल्याचा आरोप होत आहे, तसेच हि परिस्थिती सत्य असून दोन्ही कचरा गाडीत बॅटरी नाही आहे असे प्रसार माध्यमांना सुद्धा आढळले.


गावात दोन कचरा गाड्या उपलब्ध असतानाही कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर का केला जात आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. प्रत्यक्ष कचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर वापरला जात आहे की केवळ बिल काढण्यासाठीच ही व्यवस्था सुरू आहे, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

शासनाकडून इलेक्ट्रिक कचरा गाड्यांना प्रोत्साहन दिले जात असताना, इंधन बचत आणि पर्यावरण रक्षणाचा उद्देश हातगावात दुर्लक्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.
महिला बचत गटाला कचरा गाडी चालवण्याचे टेंडर देण्यात आल्याचा दावा सरपंचांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात सरपंच अक्षय राऊत यांनी सोमवारी ग्रामपंचायत उघडल्यानंतर संबंधित टेंडरचे सर्व खुलासे व ठोस पुरावे सादर करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.

पण मात्र संबंधित महिला बचत गट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि आम्ही आमचा गटाचे या प्रक्रिये करिता सगळी कागदपत्रे ग्रामपंचायतीत जमा केले पण यावर ग्रामपंचायती कळून आम्हला कुठलेच टेंडर मिळाले नाही.


याचवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरपंचांनी आणखी एक दावा केला. “आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझा एक माणूस येईल आणि तो तुम्हाला कचरा गाडी सुरू करून दाखवेल. माझ्या म्हणण्यानुसार या कचरा गाड्या चालवण्याच्या कंडिशनमध्ये आहेत,” असे सरपंचांनी स्पष्टपणे माध्यमांना सांगितले.

मात्र याआधीच प्रसारमाध्यमांनी प्रत्यक्ष कचरा गाड्याजवळ येऊन प्रतिक्रिया देण्याची विनंती केली असता, सरपंचांनी त्या ठिकाणी जाणे टाळून पत्रकारांना बाहेरच बोलावून प्रतिक्रिया दिली होती. कचरा गाड्यांच्या प्रत्यक्ष अवस्थेसमोर न येता दिलेल्या प्रतिक्रियेमुळे संशय अधिक गडद होत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.


या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना सरपंच अक्षय राऊत यांनी स्पष्ट केले की, “मी मागील पाच वर्षांपासून हातगाव ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मी जिंकली असून, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहण्याची माझी तयारी आहे. याच राजकीय पार्श्वभूमीमुळे माझ्या विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठी हा डाव रचला आहे,” असा आरोप त्यांनी केला.


एकीकडे शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाडी सुरू करून दाखवण्याचा दावा, तर दुसरीकडे बंद पडलेल्या गाड्या, ट्रॅक्टरचा वापर आणि टेंडर अंमलबजावणीतील अस्पष्टता व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचा नातेवाईकांचे ट्रॅक्टर कचरा उचलण्या करिता? —या सगळ्यांमुळे हातगाव ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापनावरचे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.

आता प्रत्यक्षात गाडी सुरू होते की नाही, आणि सोमवारी दिले जाणारे पुरावे काय सांगतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!