Join WhatsApp group

Ads

उद्या निकाल… आणि परवा ‘हम साथ साथ है!’मुर्तिजापूर नगर परिषदेच्या राजकारणातील वास्तवाचे दर्शन

By Sarkarmzanews

December 20, 2025 10:39 am

Ads

मुर्तिजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून संपूर्ण शहरात प्रचंड उत्सुकता आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाचा गड कोसळणार आणि कोणाचा झेंडा फडकणार या चर्चांनी गावातील चौक, चहाचे टपरे, सोशल मिडिया आणि राजकीय अड्डे गजबजून गेले आहेत. प्रत्येक नागरिक आतुरतेने या निर्णयाची वाट पाहत आहेत.

मात्र या साऱ्या निवडणूक प्रक्रियेत एक कटू सत्य पुन्हा एकदा समोर येणार आहे—राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो, आणि कोणी कायमचा शत्रूही नसतो. ही साधी गोष्ट सामान्य, भोळ्या-भाबड्या जनतेपर्यंत पोहोचत नाही, किंवा मुद्दाम पोहोचू दिली जात नाही. याच अज्ञानाचा फायदा राजकीय नेते वेळोवेळी उचलताना दिसतात.

या निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळेल,
राजकीय स्वार्थासाठी जनतेला समोर करून एकमेकांविरोधात उभे केले गेले. कुठे वैचारिक भांडणे पेटवली गेली, तर कुठे जात-पात, गट-तट यांचा आधार घेत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला.
कुठे दारूचा महापूर वाहिला, तर कुठे पैशांचा उघड खेळ रंगला. मतांची किंमत ठरवली गेली, आणि लोकशाहीचा बाजार मांडला गेला होता.

आज जे एकमेकांचे कट्टर विरोधक भासवले गेले, जे भाषणांतून एकमेकांवर तोंडसुख घेत होते, जे रस्त्यावर भांडणं, आरोप-प्रत्यारोप करत होते—तेच नेते उद्या निकालानंतर नगर परिषदेच्या सभागृहात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसलेले दिसतील.

कारण निकाल काहीही लागो,
नगर परिषदेच्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर सर्व कथित विकासकामांचे “कमिशनचे पाकीट” एकत्रच वाटले जाते. तेथे न विचारधारा उरते, न भांडण, न वैर. तेथे फक्त स्वार्थ, सत्तेची गणिते आणि आर्थिक समजूतदारपणा काम करतो.

पाच वर्षांसाठी शहराच्या विकासाचे गाजर जनतेसमोर धरले जाते, पण प्रत्यक्षात विकासापेक्षा सत्ता टिकवणे, निधी वाटप आणि राजकीय सोयीस्कर मैत्री यालाच प्राधान्य दिले जाते.

आज निवडणुकीत जनतेला एकमेकांविरोधात उभे करणारे नेते, उद्या मात्र “हम साथ साथ है” या चित्रपटासारखे गुण्यागोविंदाने नांदताना दिसतील.
आपसातील राजकीय भांडण-तंटे, आरोप-प्रत्यारोप सगळे इतिहासजमा होतील—पण त्या भांडणात भरडलेली सामान्य जनता मात्र पुन्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत विसरली जाईल.

मुर्तिजापूरच्या जनतेने हे वास्तव ओळखण्याची वेळ आली आहे.
मतदान हा अधिकार आहेच, पण डोळे उघडे ठेवून, प्रश्न विचारून आणि जबाबदारी मागून मतदान करणे ही खरी लोकशाही आहे.


नाहीतर दर पाच वर्षांनी निकाल बदलतील, चेहरे बदलतील—पण राजकारणाची स्क्रिप्ट मात्र तशीच राहील.

आणि पुन्हा एकदा…
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पासून “हम साथ साथ है!”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!