Join WhatsApp group

Ads

-

पनीर नाही’ म्हणणाऱ्या हॉटेलांची संख्या वाढली; भेसळीविरोधातील कारवाईंचा परिणाम?

By Sarkar Maza

June 10, 2026 12:30 pm

Ads

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा परिणाम आता बाजारपेठेत दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विविध ठिकाणी सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याचे अनेक नागरिक आणि व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

सरकार माझा न्यूजच्या प्रतिनिधींनी शहरातील काही हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे चौकशी केली असता, अनेक ठिकाणी पनीर चिल्ली, पनीर तडका, पनीर मसाला, पनीर भुर्जी यांसारखे पदार्थ उपलब्ध नसल्याचे आढळून आले. काही हॉटेल चालकांनी पनीरचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले.

याचबरोबर चीज, लस्सी, मसाला दूध, रबडी, बासुंदी यांसारख्या पदार्थांची उपलब्धताही काही ठिकाणी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे “आजपर्यंत बाजारात नेमके काय विकले जात होते?” असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभर सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेमुळे अनेक ठिकाणी तपासण्या वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून काही विक्रेते व पुरवठादार अधिक सावध भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, पनीर किंवा दूध उत्पादनात झालेली घट आणि एफडीए कारवाई यांचा थेट संबंध असल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

अकोला जिल्ह्यातील दूध व्यवसायाबाबतही विविध चर्चा रंगत आहेत. काही व्यापारी दूध संकलन कमी झाल्याचा दावा करत असले तरी त्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये भेसळीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(अस्वीकरण : वरील वृत्तात नमूद केलेल्या काही बाबी स्थानिक पातळीवरील चर्चांवर, व्यावसायिकांच्या प्रतिक्रियांवर आणि उपलब्ध माहितींवर आधारित आहेत. संबंधित दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.)

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!