Join WhatsApp group

Ads

सेवानिवृत्तीआधीच बीडीओ पवार भोवऱ्यात! चौकशी अहवाल चार महिन्यांपासून ‘गुलदस्त्यात’; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?

By Sarkar Maza

July 25, 2026 9:45 am

Ads

चौकशी पूर्ण झाल्याचा दावा, पण अहवाल गायब; २७ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा, जिल्हा परिषद प्रशासनावरही संशयाची सुई

बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) पवार हे ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित चौकशी अहवाल चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याच्या आरोपामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

चौकशी पूर्ण झाली असल्याचा दावा केला जात असताना अहवाल अद्याप जाहीर न होणे, हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की कोणाला संरक्षण देण्याचा प्रयत्न, असा सवाल उपस्थित होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार विजय देशमुख यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या तक्रारीवर चौकशी पूर्ण झाल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने अहवाल जाणीवपूर्वक रोखून धरला आहे. जर चौकशीत काहीच निष्पन्न झाले नसेल, तर अहवाल सार्वजनिक करण्यात अडचण काय? आणि जर गंभीर बाबी आढळल्या असतील, तर कारवाई का होत नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

२२ जुलै रोजी देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशी अहवाल तातडीने देण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांत अहवाल देण्याचे आश्वासन मिळाले; मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही.यामुळे देशमुख यांनी २७ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

चौकशी अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषी आढळल्यास कोणतीही दिरंगाई न करता नियमानुसार कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.दरम्यान, पवार यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी निरोप समारंभाची तयारी सुरू असल्याची चर्चा असतानाच चौकशी अहवालावर पडदा कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

सेवानिवृत्तीपूर्वी हे प्रकरण निकाली निघणार की फाईल कायमच धूळ खात राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्रशासनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रशासनाचे मौन अनेक प्रश्नांना जन्म देत असून पारदर्शकतेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीडीओ पवार यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

या वृत्तातील आरोप तक्रारदार विजय देशमुख यांनी केलेले आहेत. चौकशीचा अधिकृत निष्कर्ष किंवा प्रशासनाचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.

Related Article

सेवानिवृत्तीआधीच बीडीओ पवार भोवऱ्यात! चौकशी अहवाल चार महिन्यांपासून ‘गुलदस्त्यात’; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?

“आज तो एकटा होता… उद्या तुमचीही पाळी येऊ शकते! : व्यापारी, राजकारण, समाज आणि पत्रकारितेचे आत्मपरीक्षण”

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? एक महिना उलटला, निंभा अतिक्रमण प्रकरणात कारवाई शून्य!

मुर्तिजापूर बंदचा स्फोटक पर्दाफाश? गटबाजी? तोडफोड? आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीमागचे धक्कादायक चित्र

धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो– मुर्तीजापुरात गुंजला तरुणाईचा आवाज. विद्यार्थ्यांच्या मोर्चाने दणाणले शहर

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!