Join WhatsApp group

Ads

-

“शेतकऱ्यांना फसवून प्रशासन झोपेत”, १५ मे रोजी ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्याचा एल्गार

By Sarkar Maza

May 12, 2026 12:46 pm

Ads

“हक्काचा विमा द्या, नाहीतर रस्त्यावरचा संताप सरकार हादरवेल” — विमा कंपन्या, प्रशासन आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा थेट आक्रोश; मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे नाही

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पिक विमा व अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून, भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या आणि शेकडो शेतकऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा धडक इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शासनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात शेतकरी कर्ज, नुकसान आणि अन्यायाच्या खाईत लोटला गेल्याचा संतप्त आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

भारतीय किसान संघाचे प्रांत उपाध्यक्ष राहुल राठी आणि आनंद बांगड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी व विविध संघटना आक्रमक भूमिकेत एकत्र आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार आणि तहसीलदार शिल्पा बोबळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच शहर पोलीस स्टेशनलाही आंदोलनाची माहिती देत निवेदन देण्यात आले आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील सातही मंडळांतील शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत असून, “शासनाच्या समित्या आदेश देतात, पण विमा कंपन्या थेट शेतकऱ्यांचे दावे नाकारतात. अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या संगनमतामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला,” असा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. “मागण्या पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आता शेतकरी शांत बसणार नाही,” असा थेट इशाराही देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या मते, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही अनेक पात्र शेतकरी अद्याप नुकसानभरपाई व विमा रकमेपासून वंचित आहेत. वारंवार निवेदने, आंदोलने आणि मागण्या करूनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याने संताप आणखी तीव्र झाला आहे.

दरम्यान, १५ मे रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास शासन आणि प्रशासकीय अधिकारी पूर्णपणे जबाबदार राहतील, असा कठोर इशारा शेतकरी संघटनांनी दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्ग रोखण्याच्या घोषणेमुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडूनही हालचालींना वेग आला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!