Join WhatsApp group

Ads

पंचायत समिती की लाचखोरीचा अड्डा? पत्रकारांनाही लाच मागणी; लोकशाहीचा चौथा स्तंभ अपमानित?

By Sarkar Maza

April 13, 2026 10:46 am

Ads

मूर्तिजापूर : तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय सध्या जनतेसाठी सेवा केंद्र नसून “लाचखोरीचे अड्डे” बनले आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोणतेही शासकीय काम—कृषी योजना, अनुदान, दाखले किंवा इतर मंजुरी—लाच दिल्याशिवाय होत नाही, अशी धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उघडपणे “काम लवकर हवे असेल तर पैसे द्यावे लागतील” अशी मागणी होत असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा डोंगर कोसळत आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे—समाजाचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांनाही लाच मागितली जात असल्याची चर्चा आहे. पत्रकार हा समाजाचा आवाज असतो, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा दुवा असतो.

अशा व्यक्तीलाच लाच मागणे ही केवळ बेकायदेशीर कृती नाही, तर अत्यंत लाजिरवाणी आणि लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारी बाब आहे. “ज्यांनी भ्रष्टाचार उघड करायचा, त्यांनाच जर भ्रष्ट यंत्रणेपुढे नतमस्तक व्हावे लागत असेल, तर ही व्यवस्था नेमकी कुठे चालली आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांनी तर कामानुसार “रेटकार्ड” ठरवले असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे नागरिकांना उघडपणे लाच मागितली जात असून, शासनाच्या पारदर्शकतेच्या धोरणांची पायमल्ली होत आहे.दरम्यान, वरिष्ठ अधिकारी या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने “कोणाच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार सुरू आहे?” अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

पंचायत समिती ही जनतेच्या सेवेसाठी आहे की लाचखोरीसाठी, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!