Join WhatsApp group

Ads

“आमदार निवासाची अब्रू धोक्यात; उंडाळकरांचा इशारा खरा ठरतोय का?”

By Sarkar Maza

April 3, 2026 9:55 am

Ads

मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे २२ वर्षांपूर्वीचे विलासकाका उंडाळकरांचे ‘ते’ खळबळजनक वक्तव्य पुन्हा चर्चेत! सध्या राज्याच्या राजकारणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित प्रकरण प्रचंड गाजत होते.

याच पार्श्वभूमीवर, आजपासून तब्बल २२ वर्षांपूर्वी साताऱ्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांनी विधिमंडळात केलेल्या एका धक्कादायक दाव्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

२००३-०४ सालात तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या विलासकाका उंडाळकर यांनी आमदार निवासातील गैरप्रकारांवरून सभागृहात अक्षरशः बॉम्बगोळा टाकला होता.

त्यांनी स्पष्टपणे आरोप केला होता की, आमदार निवास आता अनैतिक कृत्यांचे केंद्र बनले असून, तिथे व्यसनाधीन व्यक्तींचा मुक्त वावर सुरू आहे.

सुरक्षेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, अनेक लोकप्रतिनिधी रात्री-अपरात्री मद्यधुंद अवस्थेत झोकांड्या देत येतात, असा त्यांचा खळबळजनक दावा होता. या वक्तव्यामुळे त्यावेळी संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती आणि आजच्या परिस्थिती पाहता त्यांचे ते शब्द खरे ठरताना दिसत आहेत.

मुंबईत पूर्वी केवळ आकाशवाणी हे एकमेव सरकारी आमदार निवास होते. त्यानंतर १९९० च्या उत्तरार्धात नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवास उभारण्यात आले. विलासकाका उंडाळकर हे १९८० पासून आमदार असल्याने त्यांना आकाशवाणी आमदार निवासातील प्रत्येक घडामोडीची इत्थंभूत माहिती असायची. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती, ज्यामुळे ते रात्री दोन वाजेपर्यंत जागे असत.

त्यांच्या खोलीतील प्रकाश पाहून इतर लोकप्रतिनिधी दबकत वावरत असत. तरीही, त्यांच्या खास सूत्रांकडून त्यांना सर्व गोपनीय माहिती मिळत असे. कोण, कधी, कोणासोबत आणि कोणत्या अवस्थेत आले, याची संपूर्ण नोंद त्यांच्याकडे असायची. याच माहितीच्या आधारे २००४ मध्ये त्यांनी विधिमंडळात भूकंप घडवून आणला होता.

मुंबईतील आकाशवाणी, मनोरा आणि नागपूरच्या आमदार निवासात मागील काही वर्षांत अशा अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत.

२०१२ मध्ये तत्कालीन आमदार बबन शिंदे यांच्या खोलीत एका तरुणीने स्वतःचे जीवन संपवले होते.

२०१३ मध्ये आकाशवाणी आमदार निवासात जयप्रकाश दांडेगावकर यांच्या खोलीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

२०१७ मध्ये एका सामूहिक अत्याचार पीडित तरुणीने नागपूरच्या आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न केला.

२०२० मध्ये एका आंदोलक शिक्षकाने आकाशवाणी आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे काही मद्यपींनी पैशांची मागणी करून गोंधळ घातल्याचा प्रकारही घडला होता.

तसेच, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीदेखील रात्रीच्या वेळी आमदार निवासात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो, अशी गंभीर तक्रार केली होती.

पत्रकाराचे मत:आमदार निवास ही राज्याच्या धोरणकर्त्यांची निवासाची आणि सुरक्षिततेची महत्त्वाची वास्तू मानली जाते. मात्र, तिथे घडणाऱ्या अशा गंभीर व अशोभनीय घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांच्या सुरक्षेवर आणि पावित्र्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाने यावर कडक निर्बंध आणून सुरक्षेची योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!