Join WhatsApp group

Ads

व्यापाऱ्यांचा माल, आरोपी मालामाल ‘केवल’ अटकेत, पण कोट्यवधींचे रहस्य अजूनही अंधारात

By Sarkar Maza

March 29, 2026 3:52 pm

Ads

मूर्तिजापूर | प्रतिनिधी

मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याने संपूर्ण परिसर ढवळून निघाला आहे. गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपींसह तिघे अजूनही पोलिसांच्या हाती न लागल्याने संताप उसळला असून, बाजार समितीतील व्यापारी वर्ग थेट पोलिस प्रशासनावर संगनमताचे गंभीर आरोप करत आहे.

या प्रकरणात अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल, केवल सुनील अग्रवाल आणि सलोनी केवल अग्रवाल यांच्यावर बाजार समिती, अडते आणि शेतकरी यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका आहे. मात्र, इतक्या मोठ्या घोटाळ्यात आतापर्यंत केवळ केवल अग्रवाल यालाच अटक करण्यात आली आहे—उर्वरित आरोपी अद्याप फरारच आहेत.

बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, केवल अग्रवाल याचा हा पहिलाच प्रकार नाही. दर्यापूर येथे सुमारे अडीच कोटींचा अपहार, त्यानंतर मूर्तिजापूर बाजार समितीत एक कोटी आणि पुन्हा सुमारे दोन कोटींचा गैरव्यवहार—अशा सलग घोटाळ्यांची मालिका समोर येत आहे. याच सलग घोटाळ्यांमुळेच या वेळेसचे प्रकरण केवल अग्रवाल याला भोवले, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

२८ मार्च २०२६ रोजी न्यायालयात हजर करण्यात आलेल्या केवल अग्रवाल याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान ॲड. सचिन वानखडे यांनी ठोस युक्तिवाद करत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे गांभीर्य अधोरेखित केले, ज्याची दखल घेत न्यायालयाने कोठडी मंजूर केली.

दरम्यान, “बाकीचे आरोपी मोकाट आणि कारवाई फक्त एका व्यक्तीपुरतीच का?” असा संतप्त सवाल शेतकरी, अडते आणि व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. या घोटाळ्यामुळे अनेकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, पोलिसांनी तत्काळ फरार आरोपींना अटक करून तपासाची गती वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

आर्थिक व्यवहारांचा गुंता, संशयास्पद कागदपत्रे आणि फरार आरोपींचा शोध—या सगळ्यांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आता या घोटाळ्याचा खरा मास्टरमाइंड कोण, आणि पोलिसांची पुढील कारवाई किती प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!