Join WhatsApp group

Ads

उन्हाळ्यात जनता तहानलेली; “हर घर जल” ठरले फसवे स्वप्न?नरेंद्र मोदी यांच्या “हर घर जल” स्वप्नाला धक्का;

By Sarkar Maza

March 22, 2026 11:19 am

Ads

न्यूज डेस्क – दिनांक २२ :

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी हर घर जल – जल जीवन मिशन योजनेचा अनेक ठिकाणी पूर्णतः बोजवारा उडाल्याचे समोर येत आहे. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असतानाही, योजनेची मुदत संपूनही हजारो कुटुंबांना आजही पाण्याची एक थेंबही मिळालेली नाही. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

स्थानिक स्तरावर नागरिक, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, या योजनेत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम अपूर्ण आहे, जलसाठा टाक्या बांधकामाधीन अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी काम सुरूही झालेले नाही. काही गावांमध्ये तर नळजोडणी झाल्याचे दाखवले गेले असले तरी त्या नळातून आजपर्यंत पाणीच आलेले नाही.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने मोठा आर्थिक अपहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. “काम पूर्ण” दाखवून बिलांची उचल करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कामे अर्धवटच ठेवण्यात आली, असा गंभीर आरोपही पुढे येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे जे स्वप्न पाहिले होते, त्यावरच स्थानिक प्रशासनाने पाणी फिरवल्याची टीका होत आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी राबवण्यात आली होती; मात्र आजही अनेक ठिकाणी महिलांना किलोमीटरच्या अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे, सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, बोअरवेल बंद पडत आहेत, तर टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही गावांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः झगडावे लागत आहे.

यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जाते; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “तक्रारी करूनही काहीच होत नाही, अधिकारी केवळ आश्वासने देतात,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, जल जीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेत अशा प्रकारच्या अनियमितता होत असतील तर त्याचा थेट परिणाम ग्रामीण विकासावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. स्वच्छ पाण्याअभावी विविध आजारांचा धोका वाढत असल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा येत्या काळात या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.

मुदत संपली, तरी पाणी नाही – योजना कागदावरच पूर्ण?
कोट्यवधींचा निधी खर्च दाखवला; प्रत्यक्षात कामे अपूर्ण
उन्हाळ्यात नागरिक तहानलेले; टँकरवर वाढती अवलंबित्व
प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका; तक्रारींकडे दुर्लक्ष
चौकशी व कारवाईची नागरिकांकडून जोरदार मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!