Join WhatsApp group

Ads

रक्तचंदन वादात नवा ट्विस्ट; 50 लाख उचललेल्या शेतकऱ्याचे निधन ; रक्तचंदन की बिजासाल?

By Sarkar Maza

March 17, 2026 8:32 am

Ads

यवतमाळ / दिनांक १७ :
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खरशी येथील शेतकरी केशव शिंदे यांना रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यापोटी मुंबई उच्च न्यायालयाने 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते केशव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले असून त्यामुळे उचललेल्या 50 लाख रुपयांचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

केशव शिंदे यांनी कोर्टाच्या आदेशानुसार जमा केलेल्या 1 कोटी रुपयांपैकी 50 लाख रुपये उचलले होते, तर उर्वरित 50 लाख रुपये अद्यापही न्यायालयात जमा आहेत. मात्र, झाड हे रक्तचंदन नसून बिजासाल असल्याचा अहवाल सादर करत मध्य रेल्वेने हा मोबदला परत मिळावा, अशी मागणी न्यायालयात केली आहे.

रेल्वेच्या वकील निरजा चौबे यांनी सांगितले की, न्यायालयाने हे प्रकरण आता खालच्या सिव्हील कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले आहेत. बंगळुरू येथील लाकूड विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या अहवालानुसार संबंधित झाड रक्तचंदन नसून बिजासाल (Pterocarpus marsupium) असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे झाडाची किंमत केवळ 10 हजार रुपये असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकील अ‍ॅड. अंजना राऊत यांनी रेल्वेचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, झाडाची किंमत चुकीच्या पद्धतीने काढण्यात आली आहे. चोरीने तोडलेल्या लाकडाच्या बाजारभावावरून मूल्यांकन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे झाड अजूनही उभे असून त्याचे वजन सुमारे 400 टन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने नव्याने मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान तोंडी निरीक्षण करत म्हटले आहे की, नव्या मूल्यांकनात झाडाची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त निघाली तर रेल्वेला आणखी मोबदला द्यावा लागेल, तर कमी निघाल्यास शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागतील. मात्र, याबाबतचे लिखित आदेश अद्याप आलेले नाहीत.

दरम्यान, मृत शेतकरी केशव शिंदे यांचे मोठे पुत्र पंजाब शिंदे यांनी सांगितले की, उचललेले 50 लाख रुपये कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून देण्यात आले आहेत. त्यामुळे जर मूल्यांकन कमी निघाले तर पैसे परत कसे करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. तरीही न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही नियमांच्या अधीन राहून पैसे परत करण्यास तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंजाब शिंदे यांचा दावा आहे की, संबंधित झाड 100 वर्षांहून अधिक जुने असून त्याची पर्यावरणीय किंमत, ऑक्सिजन उत्पादन आणि इतर घटक लक्षात घेऊन योग्य मूल्यांकन केले पाहिजे. तसेच शेतातील भूमिगत पाइपलाईन, विहीर आणि इतर 31 झाडांचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हे प्रकरण आता यवतमाळ जिल्ह्यातील सिव्हील कोर्टात सुनावणीस येणार असून झाडाचे नव्याने मूल्यांकन झाल्यानंतरच मोबदल्याचा अंतिम निर्णय होणार आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी :
पुसद तालुक्यातील खरशी गावातील शेतकरी केशव शिंदे यांच्या 2.29 हेक्टर शेतजमिनीवरून वर्धा–यवतमाळ–पुसद–नांदेड रेल्वे मार्ग जात असल्यामुळे मध्य रेल्वेने जमीन संपादित केली होती. जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतरही शेतातील रक्तचंदनाचे झाड, इतर झाडे आणि भूमिगत पाइपलाईन यांचा मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात हायकोर्टाने एप्रिल महिन्यात रेल्वेला 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 50 लाख रुपये शेतकऱ्याला काढण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नंतर आलेल्या अहवालामुळे हे प्रकरण पुन्हा वादात सापडले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!