Join WhatsApp group

Ads

आग, जुगार आणि बेफिकीर व्यवस्था; मुर्तिजापूरमध्ये मोठा अनर्थ थोडक्यात टळला

By Sarkar Maza

March 15, 2026 8:51 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १५ :मुर्तिजापूर शहरात रविवारी वाळलेल्या गवताला लागलेल्या भीषण आगीमुळे काही काळ खळबळ उडाली. ग्रामसेवक कॉलनी, रविदास नगर तसेच गोरक्षण परिसराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत साचलेल्या वाळलेल्या गवताला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने मोठे रूप धारण केले. परिसरात धूर आणि ज्वाळा उसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत, कचरा तसेच झुडपे साचलेली होती. दुपारच्या सुमारास अचानक या गवताला आग लागली. उन्हाची तीव्रता आणि कोरडे गवत यामुळे आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. आगीचा भडका वाढत जाऊन लगतच्या शेतातील कापणीस तयार असलेल्या गव्हाच्या पिकालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धावपळ उडाली.

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाच्या अगदी जवळ रेल्वेची पटरी आहे. आग आणखी वाढली असती तर रेल्वे वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने आग वेळेत नियंत्रणात आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान, घटनास्थळी काही संशयास्पद बाबीही समोर आल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही व्यक्ती बसून जुगार खेळत असल्याची चर्चा आहे. घटनास्थळी पत्त्यांचे ढीग, दारूच्या बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्यांचा सडा पडलेला दिसून आल्याने येथे जुगार अड्डा सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या आगीचा संबंध त्या प्रकाराशी आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. मात्र घटनास्थळाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाची मोठी गाडी तेथे पोहोचू शकली नाही. त्यामुळे काही काळ परिस्थिती अधिकच गंभीर झाली. या वेळी पोलिस कर्मचारी, पत्रकार तसेच स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत बादल्यांमधून पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या या धडपडीमुळे काही वेळानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

या घटनेनंतर नगर परिषदेकडील अग्निशमन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेकडे लहान अग्निशमन वाहन तसेच अग्निशमन विभागाच्या दोन मोटारसायकली उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही त्या घटनास्थळी का पोहोचल्या नाहीत, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.याशिवाय नगर परिषदेत अग्निशमन विभागातील सेफ्टी ऑफिसरचे पद सध्या रिक्त असल्याची माहितीही समोर येत आहे.

त्यामुळे योग्य नियोजन आणि नियंत्रणाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असताना अग्निशमन विभागाची ही बेफिकीर कार्यपद्धती नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

या घटनेमुळे शहरातील मोकळ्या जागांमध्ये साचलेला कचरा, वाळलेले गवत आणि रात्री सुरू असलेल्या संशयित हालचाली याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. आता या प्रकरणी प्रशासन आणि पोलिस विभाग कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!